डिजिटल जिल्हा परिषद, जि.प. सदस्यांच्या हाती लॅपटॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 04:51 AM2018-08-31T04:51:30+5:302018-08-31T04:51:57+5:30
३८ लाखांची तरतूद : पाच गावांत कोल्हापुरी बंधाऱ्यांनाही मंजुरी
ठाणे : जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी लॅपटॉपची खरेदी लवकरच केली जाणार आहे. अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार ५८ लॅपटॉपखरेदीस गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या बैठकीत बांधकामांसह लघुपाटबंधारे विभागाच्या कामांनादेखील मंजुरी मिळाली.
जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांसह अन्य पाच आदी ५८ लॅपटॉपखरेदीला मंजुरी मिळाली. यासाठी सुमारे ३८ लाख रुपयांची तरतूद आहे. याप्रमाणेच लघुपाटबंधारे विभागाच्या टेंभुर्ली, खर्ली, ढाडरे, साखर, मुगाव आदी पाच गावांच्या कार्यक्षेत्रात कोल्हापुरी सिमेंटचे बंधारे बांधण्याच्या कामाला या बैठकीत मंजुरी देण्यात आली. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेची या कामांना मान्यता घेण्यात आली होती. त्यानुसार, स्थायी समितीमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाले. येथील यशवंत सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
लॅपटॉप हाताळणीबाबत प्रश्नचिन्ह
स्थायी समितीने लॅपटॉपखरेदीस मंजुरी दिली असली, तरी बहुतांश सदस्य हे ग्रामीण भागातील असून त्यांना लॅपटॉप हाताळणे जमते किंवा नाही, ग्रामीण दुर्गम भागात इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने या लॅपटॉपचा उपयोग ते कसा करतात, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.