उपवन तलावावर उधळपट्टीचा ‘घाट’, दशक्रिया विधीला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 04:57 AM2018-12-28T04:57:37+5:302018-12-28T04:58:00+5:30
एकीकडे फालतू प्रकल्प बंद करा आणि शाई धरणासाठी निधी द्या, असा महापौरांनी बुधवारी महासभेत फतवा काढला असताना, काही वेळातच त्यांनी उपवन तलावाच्या ठिकाणी दशक्रिया विधी घाट आणि फ्लोटिंग स्टेज बांधण्याच्या सुमारे २३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी कशी दिली, असा सवाल आता करण्यात येत आहे.
ठाणे : एकीकडे फालतू प्रकल्प बंद करा आणि शाई धरणासाठी निधी द्या, असा महापौरांनी बुधवारी महासभेत फतवा काढला असताना, काही वेळातच त्यांनी उपवन तलावाच्या ठिकाणी दशक्रिया विधी घाट आणि फ्लोटिंग स्टेज बांधण्याच्या सुमारे २३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी कशी दिली, असा सवाल आता करण्यात येत आहे. खाडीकिनारी दशक्रिया विधीघाट बांधणे अपेक्षित असताना कोणाच्या दबावाखाली उपवन तलावावर तो बांधला जात आहे, असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे. त्यातही याचा जो काही खर्च केला जाणार आहे, तो थीम पार्कसारखाच जास्त असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे यामागेही चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत महासभा सुरूहोती. पहिल्यांदाच तीन दिवस महासभा रंगली. त्यात शाई धरण मुद्याच्या महासभेत रणकंदन माजले होते. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी, तर मुंब्य्रातील फ्लोटिंग मार्केट, डोंगरावरील लाईट शो आदींसह फालतू प्रकल्पांवर निधी खर्च करण्याऐवजी शाई धरणासाठी तरतूद करावी, असे आदेश प्रशासनाला दिले. परंतु, अवघ्या काही वेळाने उपवन येथील तलावाच्या ठिकाणी दशक्रिया घाट व बुरूज बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर आणला. वास्तविक पाहता वाहत्या पाण्याच्या ठिकाणी दशक्रिया विधीघाट बांधणे अपेक्षित असताना तलावाच्या ठिकाणी तो कशाला बांधला जात आहे, असा प्रश्न काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी केला. तलावाच्या ठिकाणी जर दशक्रिया विधी सुरू झाले, तर त्या ठिकाणी अस्थी विसर्जनही सुरू होईल आणि मग तलाव परिसरात फिरण्यास कोण येणार. लहान मुलेसुद्धा येथे फिरकणार नसल्याचा मुद्दा सदस्या दीपा गावंड यांनी उपस्थित केला. परंतु, तेरी भी चुप मेरी भी चुप म्हणून सत्ताधारी शिवसेनेने हा प्रस्ताव मंजूर केला. हा घाट उभारण्यासाठी तब्बल १२ कोटी ५९ लाख २५ हजारांचा खर्च केला जाणार आहे. परंतु, तो पाण्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
दुसरीकडे याच तलावाच्या ठिकाणी दशक्रिया विधीघाट उभारताना तलावातच फ्लोटिंग स्टेज उभारण्याचा घाट घातला गेला आहे.
जिमखान्याचा प्रस्ताव मागे...
याच तलावाच्या ठिकाणी जिमखाना उभारण्याचाही घाट घातला जाणार होता. यासाठीही तब्बल ४४ कोटींची उधळपट्टी केली जाणार होती. हा प्रकल्प जरी पीपीपी तत्त्वावर केला जाणार असला, तरी यामुळे येथील महापौर निवासही अर्ध्याहून अधिक प्रमाणात बाधित होणार होते. हीच बाब सत्ताधारी मंडळींमधील काही नगरसेवकांच्या लक्षात आल्यावर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला.
सत्ताधाऱ्यांवर दबाव कोणाचा?
एकाच तलावावर एवढी उधळपट्टी करण्याची वेळ का येत आहे, एकीकडे इतर प्रकल्प फालतू असल्याचे सांगून दुसरीकडे मात्र उपवनच्या या पैशांची उधळपट्टी करणाºया ठरावांना मंजुरी कशी काय दिली गेली, असा सवाल उपस्थित झाल्यावर केवळ सत्ताधाºयांना त्यांच्याच पक्षातील काही बड्या नेत्यांचा दबाव असल्याने त्या दबावाखालीच हे प्रस्ताव मंजूर केल्याची बाब समोर आली आहे.
उपवन आर्ट फेस्टिव्हलसाठीच हे फ्लोटिंग स्टेज उभारले जाणार असून या खाजगी कार्यक्रमासाठी स्टेज उभारणीचा खर्च मात्र पालिका करणार आहे. या कामासाठी नऊ कोटी ७० लाख ५४ हजारांचा निधी खर्च केला जाईल. एकूणच दशक्रिया विधीघाटासाठी १२ कोटी, फ्लोटिंग स्टेजसाठी नऊ कोटी असा मिळून २२ कोटींहून अधिकचा निधी एकाच तलावासाठी खर्च केला जाईल. यापूवी त्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली आठ आणि १२ कोटींचा खर्च केला आहे. सत्ताधाºयांना ही उधळपट्टी वाटत नाही का, एकाच तलावावर होणारा खर्च फालतू वाटत नाही का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.