भिलारच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात पुस्तकांचे गाव उभारण्यास सहकार्य करणार- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 04:36 PM2018-12-04T16:36:12+5:302018-12-04T16:40:30+5:30
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे ठाणे ग्रंथोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.
ठाणे : भिलारच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यात देखील एक पुस्तकांचे गाव व्हावे अशी इच्छा असून यासाठी योग्य गाव सुचविल्यास जिल्हा प्रशासन पूर्णपणे सहकार्य करेल व जिल्ह्यातील ग्रंथ संस्कृती जोपासण्यासाठी अधिक प्रयत्न करेल असे जिल्हाधिकारीराजेश नार्वेकर यांनी सांगितले. येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात आज आणि उद्या ५ डिसेंबर असे दोन दिवस जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे ठाणे ग्रंथोत्सवचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी त्यांनी ग्रंथसंग्रहालय परिसरातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन काही पुस्तकांची खरेदीही केली. विशेषत: दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन पाहून ते प्रभावित झाले. अशा पुस्तकांचा ठेवा डिजिटल पद्धतीने संग्राह्य केला पाहिजे अशी गरज त्यांनी बोलून दाखविली. याठिकाणी भिवंडी येथील वाचन मंदिर, ठाणे नगर वाचन मंदिर, डोंबिवली येथील स्वामी समर्थ वाचनालय यांनी ठेवलेल्या दुर्मिळ पुस्तकांविषयी त्यांनी चर्चा केली. याठिकाणी विविध प्रकाशन संस्थांची १० ते १२ स्टॉल्स असून आज सकाळपासूनच याठिकाणी ग्रंथ प्रेमींची गर्दी सुरु झाली आहे. यावेळी ग्रंथालय संचालक सू. हि.राठोड, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी त्यांचे विचार मांडले. क्षेत्रीय अधिकारी अनंत वाघ, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह चांगदेव काळे, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती, आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यावेळी बोलतांना म्हणाले की, मुंबईलगतच्या झपाट्याने पसरलेल्या ठाणे शहरात आज उड्डाणपूल, मोठे रस्ते, मेट्रो आपण पाहत आहोत, ही सगळी या शहराची इंद्रिये आहेत मात्र ग्रंथ, साहित्य, कला, संस्कृती यांची जोपासना करणाऱ्या ठाण्यातील संस्था पाहिल्या की वाटते हा शहराचा आत्मा आहे. महाविद्यालयीन जीवन ठाण्यात गेल्याने मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वास्तुत नेहमी यायचो मात्र पुस्तके आणि ग्रंथ खरेदी करू शकण्याएवढी आर्थिक क्षमता नसायची पण आज याच वास्तुत मी मोकळेपणाने आज ग्रंथांची खरेदी करू शकतो, हे माझे भाग्य आहे. कल्याण-भिवंडी येथील वाचनालयांना आपण भेटी दिल्या असून जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयांनी ई बुक्सच्या माध्यमातून ही सर्व ग्रंथ संपदा टिकवावी तसेच विशेषत: युवा पिढीला सहजपणे उपलब्ध करून द्यावी असेही ते म्हणाले. वाचनाचे माध्यम बदलले असल्याने मराठी ग्रंथ संग्रहालयानेही आधुनिक कास धरून सुरु केलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. जिल्ह्यासाठी स्वतंत्र ऐतिहासिक वस्तू संग्रहालय असणे ही देखील गरज असून आपण त्यासाठी निश्चित प्रयत्न करीत राहूत असेही ते म्हणाले. उद्या ५ डिसेंबर रोजी ग्रंथालय संचालनालयाची सुवर्णगाथा या विषयावर परिसंवाद होईल. यात माजी ग्रंथालय संचालक डॉ बा.ए. सनान्से, श.ज.मेढेकर आदि सहभागी होतील. त्यानंतर दुपारी २ वाजता अरुण म्हात्रे, अनुजा वर्तक, मनोज क्षीरसागर यांचा गदिमा दर्शन हा गायनाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील आदर्श ग्रंथपालांचा सत्कार मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, कार्यवाह चांगदेव काळे यांच्या हस्ते होईल.