डोंबिवलीतील महिला प्रवांशांना कल्याण स्थानकात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 04:22 AM2017-09-14T04:22:18+5:302017-09-14T04:23:05+5:30
जागेवरून झालेल्या वादातून डोंबिवलीतील महिला प्रवाशांना मारहाण करत, उठविण्याचा प्रकार कल्याण स्थानकात बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठल्यानंतर तेथे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे. चारुमती वेल्हाळ (रा. डोंबिवली) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे.
डोंबिवली : जागेवरून झालेल्या वादातून डोंबिवलीतील महिला प्रवाशांना मारहाण करत, उठविण्याचा प्रकार कल्याण स्थानकात बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी मारहाण झालेल्या महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठल्यानंतर तेथे लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली आहे. चारुमती वेल्हाळ (रा. डोंबिवली) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. चारुमती मुंबईत कामाला आहेत. लोकलमध्ये बसायला जागा मिळावी, यासाठी त्या दररोज सकाळी ८.२१ च्या गाडीने डोंबिवलीहून कल्याण गाठतात. ती लोकल सीएसएमटीकरिता फलाट क्रमांक-५ वरून ८.३६ वाजता सुटते. चारुमती यांनी बुधवारीही ८.२१ च्या लोकलने कल्याण गाठले. मात्र, सीएसएमटीकरिता ही लोकल ८.४५ वाजता सुटली. या वेळी कल्याण स्थानकात लोकलमध्ये चढलेल्या महिलांनी आधीपासून बसून आलेल्या महिलांना उठण्यासाठी जबरदस्ती केली. त्याला विरोध करताच, त्यांना धक्काबुक्की करत पर्स खेचत मारहाण केली. त्यात त्यांना नखे लागली, पर्स तुटल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सुरेखा माने यांनी दिली. चारुमती यांनी सीएसएमटीला उतरल्यानंतर लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेथील पोलिसांनी ही तक्रार कल्याण रेल्वे पोलिसांकडे वर्ग केली आहे.