ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर मंकी बात चित्रपटाचा परिसंवाद संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:35 PM2018-05-15T15:35:30+5:302018-05-15T15:35:30+5:30
३७६ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर विजू माने दिग्दर्शित "मंकी बात" या आगामी चित्रपटाच्या टीमसोबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे : ३७६ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर "मंकी बात" या चित्रपटाच्या निमित्ताने परिसंवाद झाला. प्रथेप्रमाणे प्रार्थनेने कट्ट्याची सुरुवात झाली. ज्येष्ठ प्रेक्षक प्रतिनिधी विजयकुमार साळी यांनी दिपप्रज्वलन केले.
त्यानंतर सहदेव कोळंबकर याने डोंबिवली फास्ट या चित्रपटातील तर शुभांगी गजरे हिने सखाराम बाईन्डर या नाटकातील एक प्रवेश सादर केला. त्याचबरोबर स्वप्नील माने याने अधांतर या नाटकातील प्रवेश सादर केला. न्युतन लंके हिने गुलाबो या गीतावर नृत्याचे सादरीकरण केले. यानंतर "मंकी बात" या चित्रपटाच्या निमित्ताने संकेत देशपांडे याने चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने व प्रमुख भूमिका साकारणारा बालकलाकार वेदांत आपटे यांची मुलाखत घेतली. परिसंवादाच्या सुरुवातीला अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांच्या हस्ते विजू माने व वेदांत आपटे यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर या दोघांनीही प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यावेळी वेदांत याने त्याच्या चित्रपटातील भूमिकेची माहिती दिली तसेच चित्रीकरणादरम्यान झालेल्या गंमती सांगितल्या. विजू माने यांनी चित्रपटाची कथा कशी सुचली त्याचबरोबर चित्रपट करण्यामागचा विचार तसेच चित्रपटातील पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, मंगेश देसाई, अवधूत गुप्ते या कलाकारांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांबद्दल माहिती दिली. अवधूत गुप्ते यांची व्यक्तिरेखा, तिचे प्रयोजन तसेच अवधूत गुप्ते यांचीच निवड करण्यामागचे कारण या गोष्टीही विजू माने यांनी स्पष्ट केल्या. तसेच यातील काही व्यक्तिरेखा कशा प्रकारे वैयक्तिक अनुभवावरून प्रेरित आहेत तेही माने यांनी उलगडून सांगितले. प्रत्येकात एक लहान मुल दडलेले असते. लहान असण्याला वयाचे बंधन नाही. त्याचमुळे "मंकी बात" हा चित्रपट सर्व वयाच्या लहान मुलांसाठी आहे, अशीही भावना दिग्दर्शक विजू माने यांनी व्यक्त केली. या परिसंवादाच्या शेवटी अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष व सिंड्रोला चित्रपटाचे दिग्दर्शक किरण नाकती यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट आपण स्वतः पहावा आणि त्याचप्रमाणे आपल्या परिचितांनाही पाहण्यासाठी सुचवावा, चांगली कलाकृती अन्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी उचलावी, असे आवाहन केले व नेहमीप्रमाणेच अभिनय कट्टा यासुद्धा कलाकृतीच्या बरोबर उभा असल्याची ग्वाहीदेखील किरण नाकती यांनी दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संकेत देशपांडे व वीणा छत्रे यांनी केले.