डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरचा ८ नोव्हेंबरला पडदा उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 02:08 PM2018-10-31T14:08:03+5:302018-10-31T14:09:59+5:30
अखेर येत्या ८ नोव्हेंबर पासून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर सुरु होणार आहे. लोकमतचा पाठपुरावा प्रशासन आणि राजकीय मंडळी घातलेले लक्ष यामुळेच हे नाट्यगृह आता पुन्हा नव्या दमात सज्ज होत आहे.
ठाणे - घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर मधील मीनी थिएटर १ आॅक्टोबर पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर मधल्या काळात थिएटरच्या दुरुस्तीचे काम अर्ध्यावरच बंद पडले असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर या वृत्ताची दखल घेत महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह ठाण्यातील कलावतांनी या नाट्यगृहाची पाहणीसुध्दा केली होती. त्यानंतर अखेर येत्या ८ नोव्हेंबर रोजी हे मिनीथिएटर पडदा उघडणार आहे. या दिवशी दिवाळी संध्याकाळ हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुख्य नाट्यगृहाचे मिनी थिएटर १ आॅक्टोबर पासून पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. परंतु यामुळे या ठिकाणी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांना याचा फटका बसला होता. या संदर्भात पालिकेच्या संबधीत विभागाशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, मिनी थिएटरमध्ये गळती सुरु झाली आहे. ही गळती नेमकी कशामुळे होत आहे, याचे कारण अद्याप सापडू शकलेले नव्हते. त्यानंतर पाच महिन्यानंतर या थिएटरच्या कामाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यासाठी ८० लाखांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानुसार मे अखेर हे थिएटर खुले होईल असा दावाही पालिकेने केला होता. दरम्यान या थिएटरचे सुरु असलेले काम अर्ध्यावरच थांबले असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द झाले होते. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे आणि मराठी कलाकारांनी या नाट्यगृहाचा पाहणी दौरा केला होता. त्यानंतर दिवाळी पर्यंत हे नाट्यगृह सुरु न झाल्यास दिवाळी पहाटचा कार्यक्रम आम्ही करु असा इशाराही कलाकारांनी दिला होता. त्यानंतर या थिएटरच्या दुरुस्तीच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुर झाला असून येत्या ८ नोव्हेंबरला पुन्हा मोठ्या दिमाखात हे नाट्यगृह सुरु होणार आहे. या दिवशी सांयकाळी दिवाळी संध्याकाळ या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाण्यातील कलाकारांनी मानले आभार
लोकमतमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर मिनी थिएटरच्या दुरु स्तीच्या कामात प्रचंड दिरंगाई होत असल्याबद्दल टॅगच्या कलाकारांनी दिलेल्या उपोषणाच्या इशाºयाची बातमी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर कलाकार आणि महापौर, सभागृह नेते यांनी याची पाहणी केली. त्यानंतर लागलीच कामाला सुरवातसुध्दा झाली. मंगळवारी पुन्हा एकदा त्याच सगळ्या मंडळीना घेऊन काम पूर्णत्वाकडे जात असताना पाहणी दौरा केला. तेव्हा टॅगचे अध्यक्ष निर्माते अशोक नारकर, सहसचिव अभिनेता मंगेश देसाई आणि मी स्वत: उपस्थित होतो. येत्या १० दिवसात मिनी थियेटर पुन्हा एकदा रसिकांसाठी खुले होईल. त्यानुसार महापौर सभागृह नेते, महापालिका प्रशासन यांचेही आम्ही आभार मानतो. (विजू माने - कलाकार, दिग्दर्शक)