वन विभागाच्या जागेवर डम्पिंग

By admin | Published: April 9, 2016 03:39 AM2016-04-09T03:39:00+5:302016-04-09T03:39:00+5:30

शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना अखेर शीळ येथील वन विभागाच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या खदाणीची जागा महापालिकेला डम्पिंगसाठी उपलब्ध झाली आहे.

Dumping at forest area | वन विभागाच्या जागेवर डम्पिंग

वन विभागाच्या जागेवर डम्पिंग

Next

ठाणे : शहरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना अखेर शीळ येथील वन विभागाच्या अखत्यारीतील बंद पडलेल्या खदाणीची जागा महापालिकेला डम्पिंगसाठी उपलब्ध झाली आहे. पर्यावरण विभागाने यास मान्यता दिली असून या ठिकाणी ४०० मे. टन ओल्या कचऱ्यावर अ‍ॅरोबिक कम्पोस्टिंग पद्धतीने खतनिर्मिती केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
ठाणे शहराची लोकसंख्या २० लाखांच्यावर गेली असतानादेखील आजही ठाणे महापालिकेला हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळाले नव्हते. शहरात रोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून सध्या त्याची विल्हेवाट दिव्यातील क्षेपणभूमीवर लावली जात आहे. परंतु, डायघरचा प्रश्न स्थानिकांच्या विरोधामुळे आणि तळोजा येथील सामायिक भरावभूमीचा प्रस्ताव दरामध्ये आलेल्या तफावतीमुळे रखडल्याने पालिकेला अद्यापही शहरातील कचऱ्याची समस्या मार्गी लावता आलेली नाही. सध्या दिवा-खर्डी येथील जागेवर कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे. परंतु, येथील रहिवाशांचाही विरोध झाल्याने आणि उच्च न्यायालयानेदेखील डम्पिंगच्या मुद्यावरुन पालिकेची कानउघाडणी केल्याने अखेर पालिकेने हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. शीळ येथील वन विभागाची जागा मिळावी म्हणून पालिकेने वन विभागाशी वारंवार पत्रव्यवहारही केला होता. परंतु, त्यावर अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर, पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्राधिकरणाने ही जागा पालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे.
मौजे शीळ येथे वन खात्याच्या जमिनीवर अंदाजे अडीच एकर जागेत बंद पडलेली खदाण आहे. त्या ठिकाणी घनकचऱ्याचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाणार आहे. या जागेमध्ये शहरामध्ये संकलित होणाऱ्या जवळपास ४०० टन ओल्या कचऱ्यावर अ‍ॅरोबिक कम्पोस्टिंग पद्धतीने खतनिर्मिती करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. याशिवाय, दिवा येथील उघड्यावर असलेले डम्पिंगदेखील आता बंद स्वरूपात कार्यरत केले जाणार आहे.

Web Title: Dumping at forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.