छोट्या दागिन्यांवर भर; मंदीने सराफ बाजार झाकोळला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:45 AM2019-10-09T05:45:02+5:302019-10-09T05:45:19+5:30
मंगळवारी २४ कॅरेटच्या सोन्याचा तोळ्याचा दर ३९ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर ४६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली : गेल्या सात वर्षांमधील सोन्याच्या दरांतील उच्चांक यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर गाठला असल्याने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसºयाला सोने खरेदीची परंपरा टिकवायची म्हणून छोटे अलंकार किंवा सोन्याची कमी वजनाची वळी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. त्यामुळे दरवर्षीसारखी हजारो कोटी रुपयांची उलाढाल राज्यात झाली नसल्याचे महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाने सांगितले.
मंगळवारी २४ कॅरेटच्या सोन्याचा तोळ्याचा दर ३९ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर ४६ हजार ५०० रुपये प्रतिकिलो होता. देशातील आर्थिक मंदीचा फटका देशभरातील एक कोटी सुवर्ण कारागिरांना बसला असून त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. दसºयानिमित्त असमाधानकारक व्यवसाय झाल्याने देशामधील सहा लाख सराफांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच आयात शुल्क वाढवण्यात आल्याने आयात घटली आहे. त्याचा परिणाम दरावर होत असून त्याची झळ खरेदीदाराला बसते आहे.
आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलचे माजी रिजनल अध्यक्ष तसेच महाराष्ट्र सुवर्णकार सराफ महामंडळाचे सल्लागार नितीन कदम (ठाणे) यांनी ही खंत ‘लोकमत’कडे व्यक्त केली. ते म्हणाले, सोन्याच्या भाववाढीने उच्चांक गाठल्याचा फटका जसा ग्राहकाला बसतो आहे तसा तो सराफ व्यावसायिकांनाही बसतो आहे. देशात सुमारे तीन कोटी सुवर्ण कारागीर होते. सोन्याच्या प्रचंड दरवाढीमुळे ग्राहक नसल्याने आणि सोन्याच्या मागणीत कमालीची घट झाल्याने त्यापैकी सुमारे एक कोटी कारागिरांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पश्चिम बंगाल, कारवार तसेच महाराष्ट्र आदी भागांमधील कारागिरांना मोठा फटका बसला आहे. एखादा दागिना घडवण्यासाठी साधारणपणे पंधरा प्रकारच्या विविध पद्धतींनी त्यावर कलाकुसर केली जाते. दागिना घडवण्याच्या कलाकुसरीसाठी प्रत्येक कारागिराचे कौशल्य असते, तीच त्यांची ओळख असते. त्यामुळे केंद्र सरकारने कोट्यवधी कारागिरांवर, त्यांच्या कुटुंबीयांवर आलेल्या उपासमारीच्या संकटाची वेळीच गंभीर नोंद घ्यायला हवी. सराफ व्यवसाय तेजीत आणण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत. आमच्या विविध संस्थांची वर्षानुवर्षांची ही मागणी आहे, पण त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने या व्यवसायातील अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये फारसे यश येत नसल्याने अनेक व्यापारी जोड व्यवसायांकडे वळत आहेत. सराफ व्यावसायिकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा सन्मानाचा होता. पण आता व्यवसायच नसल्याने दिवसेंदिवस सराफ व्यापारी नैराश्येत गेले आहेत. देशाच्या जीडीपीमध्ये साधारणपणे ७ टक्के योगदान हे सराफ बाजाराचे असते. त्यामुळे या व्यवसायाकडे कानाडोळा करून चालणार नाही, असेही कदम म्हणाले.
पॅकेज देण्याची गरज
बँका गोल्ड लोन देत नाहीत, ही समस्या आहे. तसेच केंद्र सरकारकडून या उद्योगाला अन्य उद्योगांप्रमाणे तग धरण्यासाठी पॅकेज दिले जाण्याची गरज आहे. दसºयाला ग्राहकांनी वळे, चेन, कानातले, छोटी मंगळसूत्रे, अंगठ्या अशा छोट्या दागिन्यांची खरेदी करून केवळ मुहूर्त साधला, असे निरीक्षण नितीन कदम यांनी नोंदवले.