अखेर नगराध्यक्षपदासाठी 21 नोव्हेंबरला मतदान, नव्याने जाहीर केला निवडणूक कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 08:10 PM2017-11-15T20:10:16+5:302017-11-15T20:10:38+5:30
अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 14 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला होता.
अंबरनाथ/बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम 14 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला होता. मात्र हा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला अवघ्या 3 तासांत रद्द करावा लागला होता. 15 नोव्हेंबरला नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, आता नगराध्यक्षपदाची निवडणूक 21 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 18 नोव्हेंबर देण्यात आली आहे. या आदेशात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख देखील 18 नोव्हेंबरच देण्यात आली आहे. राजकीय दबावामुळे असा प्रकारचा निवडणूक कार्यक्रम पुढे आल्याचे समोर येत आहे.
14 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयाने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात 24 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 15 नोव्हेंबर ही एकमेव ठेवल्याने हे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला मागे घेण्याची वेळ आली. एका दिवसात उमेदवारी निश्चिती कशी होणार ही राजकीय अडचण लक्षात घेऊन हे आदेश रद्द करण्यात आले. बुधवारी 15 नोव्हेंबरला पुन्हा नव्याने नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या नव्या कार्यक्रमानुसार आता अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुका ह्या 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता घेण्यात येणार आहे. या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही 18 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत राहणार आहे. या अर्जाची छाननी करून वैध उमेदवारांची यादी 2 नंतर जाहीर करण्यात येणार आहे. तर लागलीच दोन तासात म्हणजे दुपारी 4 वाजेर्पयत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ निश्चित केली आहे. ज्या दिवशी उमेदवारी भरणार त्याच दिवशी उमेदवारी मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच 21 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता पालिकेच्या सभागृहात निवडणूकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्याने आता राजकीय समीकरणे जोराने फिरण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय दगाफटका बसू नये यासाठी शिवसेना सतर्क झाली आहे.