बदल्यांसाठी शिक्षकांची बनावटगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:46 PM2019-03-10T22:46:42+5:302019-03-10T22:48:05+5:30
खोटे वैद्यकीय दाखले जोडले; न्यायालयात जाण्याचा इशारा
ठाणे : जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या मंगळवारी झाल्या. मात्र, काही शिक्षकांनी प्राधान्यक्रमाने सोयीच्या शाळेवर बदलीसाठी खोटी माहिती, बोगस वैद्यकीय दाखले आदी खोटी माहिती दिल्याची चर्चा आहे. शहानिशा करून हा अन्याय दूर करावा, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अन्यथा प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शिक्षकांमध्ये दिसून येत आहे.
या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये बहुतांशी शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेचा विचार न करता या बदल्या झाल्याची चर्चा आहे. या शिवाय या जिल्हाअंतर्गत बदल्या करताना शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून सोयीच्या बदल्या केल्याचा आरोप केले जात आहे. दोन हजार ११९ शिक्षकांपैकी बहुतांशी शिक्षकांनी खोटी माहिती देऊन सोयीच्या शाळा घेतल्याची माहिती अन्यायग्रस्त शिक्षकांच्या हाती लागली आहे. त्यांनी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. या बदल्यांमध्ये पतीपत्नीचे एकत्रीकरण करताना दोघाच्या शाळेतील अंतर ३० किलोमीटर असल्याची खोटी माहिती नोंदवण्यात आली असल्याचे ऐकायला मिळत आहे. या बदल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातीलच शिक्षकांना पती पत्नी एकत्रीकरणाच लाभ मिळावा, असे शासननिर्णयात नमूद केले आहे. पण इतर जिल्हा परिषदेच्या ३० किलोमीटरच्या शाळा दाखवून लाभ घेतल्याचे बोलले जात आहे. विशेषत: पालघर जिल्ह्यातून आलेल्या काही शिक्षकांची शाळा अवघड नसतानादेखील ती शाळा अवघड असल्याचे दाखवून सोयीच्या शाळेचा लाभ घेतल्याचे दिसून येत आहे. याची प्रशासनाने खातरजमा करण्यासह दुर्धर आजाराचे खोटे दाखले दिल्याचे बोलले जात आहे. याप्रमाणेच विविध संवर्गात लाभ घेणाऱ्या शिक्षकांची कागदपत्रे, पतीपत्नीचे अंतर प्राथमिक स्तरावर तपासून खातरजमा न केल्याने त्यांना प्राधान्यक्र माचा लाभ सरसकट दिल्याने इतरांवर अन्याय झाल्यामुळे शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन
शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत या आॅनलाइन बदल्या पुणे येथून ‘एनआयसी’ यंत्रणेव्दारे केल्या आहेत. सर्व शिक्षकांना बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.
उच्च न्यायालयाच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासननिर्णया प्रमाणे कार्यवाही करावी, असे स्पष्ट केले असताना याचे उल्लंघन होऊन या बदल्यांची प्रक्रि या राबवली आहे.
त्यात अनेक शिक्षकांनी खोटी माहिती देऊन बहुतांशी पात्र व सेवाज्येष्ठता असलेल्या शिक्षकांना आदिवासी दुर्गमभागातील अवघड क्षेत्राच्या शाळांवर जाण्याचा प्रसंग ओढवला आहे. यात शिक्षिकांचाही मोठ्याप्रमाणात समावेश आहे.