तोतया पोलिसाने मंगळसूत्र लांबवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 06:24 AM2018-05-09T06:24:58+5:302018-05-09T06:24:58+5:30
प्लास्टिक पिशव्या बाळगल्याप्रकरणी दुकानदार महिलेला धमकावत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोतया पोलिसाने लांबवल्याची घटना सोमवारी शहरातील शिवाजी उद्योगनगरमध्ये घडली.
डोंबिवली : प्लास्टिक पिशव्या बाळगल्याप्रकरणी दुकानदार महिलेला धमकावत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोतया पोलिसाने लांबवल्याची घटना सोमवारी शहरातील शिवाजी उद्योगनगरमध्ये घडली.
मानपाडा रोड लागतच्या शिवाजी उद्योगनगरमधील मीना जनरल स्टोअर्समध्ये सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास एक जण आला. त्याने दुकानातील महिलेकडून अर्धा लिटर दूध आणि भजीची दोन पाकिटे मागितली. या वेळी त्याच्या मागणीनुसार महिलेने प्लास्टिकची पिशवी देताच या पिशव्या बंद झाल्या मग तुम्ही कशा वापरत, असा सवाल केला. या पिशव्या वापरल्याप्रकरणी १७ हजारांचा दंड भरावा लागेल, असे धमकावले. दुकानात अजून पिशव्या आहेत का, असे विचारत गल्ला उघडून त्यात पिशव्या शोधू लागला. त्या न मिळाल्याने त्याने महिलेच्या गळ्यातील ३० हजारांचे मंगळसूत्र काढून घेतले. मानपाडा पोलीस ठाण्यात १० मिनिटात या दंड भरा आणि मंगळ्सूत्र घेऊन जा, असे सांगत रिक्षेतून पोबारा केला. फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्याआधारे पोलिसांनी तोतया पोलीसाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कल्याणमधील एका महिला दुकानदारालाही तोतया पोलिसाने धमकावत तिच्याकडील ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची नुकतीच घडली होती. या प्रकारानंतर त्या तोतया पोलिसाने डोंबिवलीत मोर्चा वळवल्याचे सोमवारच्या घटनेवरून दिसते.