अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती
By जितेंद्र कालेकर | Published: July 30, 2018 10:06 PM2018-07-30T22:06:12+5:302018-07-30T22:29:56+5:30
परमवीर सिंग यांची अपर महासंचालक कायदा सुव्यवस्था म्हणून महासंचालक कार्यालयात बदली झाली असून ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
ठाणे : अखेर ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बहुचर्चित बदली झाली असून सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास यासंदर्भातले अधिकृत आदेश गृहविभागाने काढले. त्यांच्याकडे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची (अपर महासंचालक) जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर ठाण्याच्या आयुक्तपदी राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक विवेक फणसाळकर यांच्या नियुक्तीचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.
रविवारी दिवसभर पोलीस आयुक्त सिंग यांच्या बदलीची चर्चा असतांना सोमवारीही ते आपल्या बदलीच्या आदेशाच्या प्रतिक्षेत होते. मुळात, ठाण्यातून थेट मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागेल, अशी अपेक्षा सिंग यांना होती. मात्र, तिकडे अगदी अखेरच्या क्षणी सेवाजेष्ठतेमध्ये सिंग यांच्यापेक्षा तीन वर्षांनी वरिष्ठ असलेल्या सुबोध जैसवाल यांची केंद्रातून (रॉ) थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. त्यामुळे सिंग हे काहीसे नाराज होते. त्यानंतर ठाण्यातच आहे त्याठिकाणी आयुक्तपदी मुदतवाढ मिळेल, अशीही एक चर्चा होती. पण, महिनाभरातच त्याही चर्चेला पूर्णविराम मिळाला. आणि एकेकाळी ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त असलेले फणसाळकर यांची आता थेट आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे.
१९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले फणसाळकर हे अतिरिक्त महासंचालक म्हणून नववे तर ठाण्याचे २२ वे आयुक्त म्हणून ते पदभार घेतील. ठाण्यात २००८ ते २०१० या कालावधीत ते ठाणे विभागाचे अतिरिक्त आयुक्त होते. त्यानंतर त्यांची ठाण्यातून मुंबई पोलीस आयुक्तालयात वाहतूक शाखेच्या सह आयुक्तपदी बदली झाली. मुंबईच्या वाहतूक शाखेत त्यांनी चांगला दबदबा निर्माण केला होता. वाहतूक नियम मोडणाऱ्या पोलिसांवरही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. यातून राजकीय नेत्यांचीही सुटका झाली नव्हती. पुढे मुंबई आयुक्तालयातच त्यांनी प्रशासन सह आयुक्तपदाचाही कार्यभार सांभाळला. त्यानंतर राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात (अतिरिक्त महासंचालक) आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही कणखरपणे जबाबदारी सांभाळली. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात. राज्यात मुंबई पाठोपाठ ठाण्याचे पोलीस आयुक्तपद प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे फणसाळकर ठाण्यातील गुन्हेगारीचा आकडा कमी करण्यात काय बदल घडवून आणतात, याकडे आता ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
.......................................
ठाणेकरांचे सहकार्य लाभले- परमवीर सिंग
गेल्या तीन वर्षात ठाणेकरांचे चांगले सहकार्य लाभले. त्यामुळे अनेक गुन्हे उघड करता आले. आपल्या कार्यकाळात अनेक गुन्हयांमध्ये घट आणल्याचेही मावळते पोलीस आयुक्त परमवीर सिंग म्हणाले.