दिवा डम्पींगची आग अद्यापही शमली नाही, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:54 PM2018-03-09T14:54:40+5:302018-03-09T14:54:40+5:30
बुधवारी मध्यरात्री दिवा येथील डम्पींगला लागलेली आग शुक्रवारी देखील धगधगत होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. ही आग ५० टक्के विझविण्यात आल्याचा दावा अग्निशमन विभागाने केला.
ठाणे - दिव्यातील डम्पींगला बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास लागलेली आग शुक्रवारी देखील धगदगत होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे पुन्हा आठ टँकर पाठविण्यात आले आहेत. परंतु पाणी संपत असल्याने पुन्हा टँकर घटनास्थळावर पोहचे पर्यंत आग वाढत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणने आहे. परंतु या आगीच्या धुराने येथील नागरीक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.
ठाणे शहरातील संपूर्ण कचरा हा अनाधिकृतपणे दिवा या ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे या ठिकाणी सतत आगीच्या घटना घडत असतात. बुधवारी रात्री देखील येथील डम्पींगला आग लागली. परंतु ही आग लागली का लावली गेली असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या आधीच्या काळातच डम्पींगला आग लागल्याची घटना कशी घडते असा सवालही आता रहिवासी करु लागले आहेत. दरम्यान गुरुवारी सकाळी ११ वाजता पाण्याच्या दोन टँकरबरोबर अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दीड वाजेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीच संपल्याने अग्निशमन विभागाच्या जवानांना देखील पुन्हा परतावे लागले होते. त्यानंतर गुरुवारी रात्रभर आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु ही आग विझू शकलेली नाही. शुक्रवारी सकाळी देखील आठ टँकर पाठविण्यात आले होते. त्यानंतर ही आग ५० टक्यापर्यंत आटोक्यात आली असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केला आहे. रात्री पर्यंत या आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळविले जाईल असा आशावादही अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.