ठाणे सिव्हील हॉस्पिटलच्या आवारात वाहनांना आग; चार वाहने जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:09 PM2018-01-28T21:09:45+5:302018-01-28T21:15:43+5:30
ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हील) रुग्णालयाच्या आवारात उभ्या असलेल्या चार वाहनांना रविवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये चारही वाहने जळून खाक झाली आहेत. यात तीन रुग्णवाहिका आणि एका जीपचा समावेश असून आगीचे कारण मात्र अद्याप कळले नसल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. त्यामुळे ही आग लागली की लावली, याबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. बाळचोरीच्या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात लागलेल्या आगीने पुन्हा एकदा रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर आला आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील अपघात विभागाच्या इमारतीलगत असलेल्या मोकळ्या जागेत भंगार झालेली वाहने एकमेकांना खेटून उभी केलेली आहेत. शासकीय वाहने असल्याने ही वाहने कित्येक दिवसांपासून रुग्णालयाच्या आवारातच आहेत. याच वाहनांना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केल्याने ही चारही वाहने जळाली. आगीची माहिती मिळताच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या जवानांनी तातडीने धाव घेत अवघ्या १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आणली. या वेळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.
‘‘घटनेची माहिती मिळताच तातडीने धाव घेऊन पहिली आग आटोक्यात आणली. यामध्ये चार वाहने जळाली असून ही आग कशामुळे लागली, हे मात्र समजू शकले नाही. जळालेली वाहनेही भंगारात काढलेली होती.’’ - संतोष कदम, ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षप्रमुख
‘‘भंगारात काढलेल्या जुन्या वाहनांना आग लागली आहे. उंदरांनी वायर कुरतडल्याने बहुधा शॉर्टसर्किट झाले असावे. त्यामुळे ही आग लागली असावी.’’ - डॉ. बी.सी. केम्पीपाटील, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हील हॉस्पिटल
आगीमुळे भीतीचे वातावरण
दुपारची वेळ असल्याने रुग्ण विश्रांती घेत होते. त्यातच, रविवार असल्याने रुग्णालय आवारात शांतता होती. आग लागल्याने रुग्णालय आवारात गोंधळ उडाला आणि क्षणार्धात रुग्ण आणि नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यातच, अग्निशमन दलाच्या एकामागून एक अशा चार गाड्या घंटा वाजवत रुग्णालयाच्या मुख्य गेटमधून आत शिरल्याने रुग्णालयात काय झाले, हे पाहण्यासाठी लोकांनीदेखील एकच गर्दी केली.