काशिमिरा येथून ५ बांगलादेशी दरोडेखोरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 05:56 PM2018-03-30T17:56:38+5:302018-03-30T17:56:56+5:30
काशिमीरा येथे दरोडा टाकणारया ५ बांगलादेशी दरोडेखोरांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील तिघे विमानाने तर दोघे घुसखोरी करून मुंबईत आले होते.
मीरारोड - काशिमीरा येथे दरोडा टाकणारया ५ बांगलादेशी दरोडेखोरांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. यातील तिघे विमानाने तर दोघे घुसखोरी करून मुंबईत आले होते.
चेणे येथील द्वारका हॉटेल समोर राहणारे गोकुळ रामदास वाघ यांच्या घरी २२ मार्च रोजी पहाटे अडिजच्या सुमारास अनोळखी दरोडेखोरांनी खिडकीची लोखंडी जाळी काढून आत प्रवेश केला. घरात शिरातच त्यांनी वाघ कुटुंबीयांना चाकू, लोखंडी टॉमी, पाना, स्क्रुडायव्हर आदीचा धाक दाखवून मारहाण केली. नंतर साडी आणि बनियनने सर्वांना बांधून टाकले आणि घरातील रोख, दागिने, मोबाईल, टॅब असा ९ लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला होता.
वाघ यांच्या फिर्यादीवरून काशिमिरा पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी तातडीने विशेष पथक नेमले होते. पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक व्यंकट आंधळे, काशिमिरा युनिटचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक श्रीकांत कारंडे, अभिजीत टेलर सह वेळे, ढेमरे, वाडिले, जाधव, पोशिरकर, पंडित, थापा, पाटील, शिंदे, जगताप यांच्या पथकाने या बांग्लादेशी दरोडेखोरांचा शोध चालवला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमिरा युनिटने विविध प्रकारच्या तांत्रिक माहितीच्या आधारे तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या द्वारे आरोपींचा शोध सुरु केला. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज मधून पोलिसांना या दरोड्यासाठी कारचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या गाडीचा शोध घेण्यास सुरवात केली असता २८ मार्च रोजी वसई कडून ती घोडबंदरच्या वरसावे दिशेला येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी लागलीच सापळा रचून गाडी अडवली व आतील लोकांना शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केली असता ते सर्व बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. वाघ यांच्या घरी दरोडा टाकल्याचे पण त्यांनी कबूल केले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नांवे मोहम्मद पलश मोहम्मद इस्माईल हवालदार ( ३२) ; लुकमान चिना मियाँ (२३) ; बप्पी आकुबर शेख (२७) ; मोहम्मद मोनीर लतिफ शेख ( ३१) ; महम्मद अक्रम इरफान अली (२८) अशी आहेत. हे सर्व बांग्लादेशी दरोडेखोर बांग्लादेशच्या खुलाना व सिल्हेट जिल्ह्यातील राहणारे आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून दरोड्यात वापरलेली कार, अवजारे काही मुद्देमाल व आरोपींचे मोबाईल आदी हस्तगत केले आहेत. त्यांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपींना काशिमिरा पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
यातील पलश , मोनीर , अक्रम हे तीघे आरोपी हे ढाका येथून मुंबईला विमानाने आले असून लुकमान व बप्पी हे दोघे आरोपी बेयदेशीरपणे भारतीय सीमेत घुसून रेल्वेने मुंबईत आले आहेत. सदर आरोपी हे दरोडा टाकायच्या काही दिवस आधीच काशिमिऱ्याच्या निलकमल नाका जवळील जनता चाळीत रहायला आले होते.
सलाम गुप्ता याच्या खोलीत हे सर्व आरोपी रहात होते. गुन्ह्यात वापरलेली गाडी देखील सलाम यांची आहे. सलाम यांची पत्नी पश्चिम बंगालची असून सदर बांग्लादेशी दरोडेखोर हे तीच्या ओळखीचे असल्याने येथे रहायला आले होते असे सूत्रांनी सांगितले.