ठाण्यातील गडकरी रंगायतन २५ डिसेंबर पर्यंत राहणार बंद, सर्व प्रयोग रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 06:01 PM2017-12-08T18:01:43+5:302017-12-08T18:07:13+5:30
ठाण्यातील गडकरी रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. परंतु या दुरुस्तीला काही दिवस जाणार असल्याने २५ डिसेंबर पर्यंतचे सर्व प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.
ठाणे - ठाण्यातील महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा भाग कोसळल्याची घटना बुधवारी घडली. त्यानंतर आता याच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यानुसार २५ डिसेंबर पर्यंत असलेले सर्व प्रयोग रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
गडकरी रंगायतनमधील खालील बाजूला असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताचा काही भाग पडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली आहे. यावेळी पर्यावरण दक्षता मंडळाचा पर्यावरण चित्रपट महोत्सव सुरु होता. यावेळी ७०० विद्यार्थी उपस्थित होते. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. परंतु या घटनेनंतर गडकरी रंगायतनचा तांत्रिक अहवाल तयार करण्यात येत होता. त्यानुसार आता हा अहवाल जवळ जवळ प्राप्त झाला असून येत्या २५ डिसेंबर पर्यंत गडकरी रंगायतन बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आतील छताच्या दुरुस्तीचे काम शनिवार पासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. दुरुस्तीसाठी आतील बाजूस परांची देखील बसविण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार आता २५ डिसेंबर पर्यंतचे सर्वच प्रयोग रद्द करण्याच्या सुचना महापालिकेने गडकरी रंगायतन प्रशासनाला दिल्या आहेत. त्यामुळे आता नाट्यप्रेमींची चांगलीच निराशा होणार आहे. गडकरी रंगायतनमध्ये रोज साधारणपणे २ प्रयोग होत असून येथे ९६२ ची आसन क्षमता आहे. तर गडकरीचे वार्षिक उत्पन्न हे सुमारे सव्वा कोटींच्या आसपास आहे. त्यानुसार फारसे नुकसान होणार नसले तरी वेळेत दुरुस्ती व्हावी अशी अपेक्षा नाट्यप्रेमींनी व्यक्त केली आहे.