घंटाळी मैदानात सुरु आहे भ्रष्टाचाराचा खेळ, भाजपाने पकडले शिवसेनेला कोंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 03:49 PM2018-09-27T15:49:27+5:302018-09-27T15:51:01+5:30
घंटाळी मैदानाच्या मुद्यावरुन गुरुवारी झालेल्या महासभेत भाजपाने शिवसेनेला चांगलेच कोंडीत पकडले. शिवसेनेच्या एका जेष्ठ माजी नगरसेवकाला हे मैदान आंदन देण्यात आले असून संबधींताबरोबर कोणत्याही प्रकारचा करार न झाल्याने पालिकेचे नुकसान होत असल्याची बाब यावेळी उपस्थित करण्यात आली.
ठाणे - ठाणे महापालिकेच्या मालकीचे असलेल्या घंटाळी मैदानात भरगच्च कार्यक्रम होत असतात. परंतु त्यातून पालिकेला कोणत्याही स्वरुपाचे भाडेच मिळत नसल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी उपस्थित केला. तर या मैदानाच्या बाबतीत निविदा काढली असून संबधीत ठेकेदाराबरोबर कोणत्याही प्रकारचा करारच केला नसल्याची गंभीर बाब उघडकीस करीत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला. परंतु हे मैदान शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाला आंदन दिल्याची चर्चा सुरु असल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी हा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपा आक्रमक झाल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांनी मागणी लावून धरली. त्यामुळे भाजपाने एक प्रकारे शिवसेनेला कोंडीत धरल्याचे दिसून आले.
गुरुवारी झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या निमित्ताने जोशी यांनी घंटाळी मैदानाबाबत काही प्रश्न उपस्थित केले. या मैदानाची निविदा काढली गेली आहे, परंतु भाडेकरार अथवा कोणत्याही प्रकारचा करार न झाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यामुळे पालिकेची वास्तु संबधींत ठेकेदाराला आंदन दिली आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली. भाजपाच्या मंडळींनी यामध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नसतांना शिवसेनेच्या मंडळींनी मात्र हे प्रकरण आपल्या अंगावर खेचून घेतले. हा मुद्दा महापौरांच्या दालनात सोडविला जावा अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी केली. त्यावरुन भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात शिवसेनेच्या एका जेष्ठ माजी नगरसेवकाच्या माध्यमातून सध्या हे मैदान सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याच्यासोबत कोणत्याही स्वरुपाचा करार करण्यात आलेला नाही. ही गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लावून धरत भाजपाने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.