दुरुस्तीलाच सरकारी बायपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 05:35 AM2018-04-25T05:35:38+5:302018-04-25T05:35:38+5:30
अधिसूचनाच नाही : पर्यायी नादुरुस्त रस्त्यांमुळे मुंब्रा रस्त्याचे काम आठवडाभर लांबणीवर
ठाणे : मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २४ एप्रिलपासून तब्बल दोन महिने या रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार ,असे शहर वाहतूक विभागाने जाहीर करुनही अद्याप या रस्त्याची दुरुस्ती सुरु झालेली नसून आणखी किमान आठवडाभर तरी ती सुरु होणार नाही, असे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. या रस्त्यावरील वाहतूक बंद केल्यावर ज्या पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे त्या रस्त्यांची सध्याची दुरवस्था दूर केल्याखेरीज मुंब्रा बायपासचे काम सुरु करु नका, अशी भूमिका ठाणे ग्रामीणचे व पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी घेतल्याने या कामाची अधिसूचना निघालेली नाही.
पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी मुंब्रा बायपासची दुरुस्ती २४ एप्रिलपासून सुरु होणार असल्याचे जाहीर केले. मात्र अजून याबाबतची अधिसूचना ठाण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रशांत नरनावरे यांनी न काढल्याने हे काम सुरु झाले नसल्याचे समजले. याबाबत ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संभाजी पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या मार्गावरील वाहतूक ज्या पर्यायी मार्गाने जाणार आहे, त्या रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. त्यांची दुरूस्ती, विद्युत व्यवस्था व वाहतूक नियंत्रण करण्याकरिता स्वयंसेवक आदीची व्यवस्था झाल्याखेरीज पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यास ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांनी विरोध केला आहे. यामुळे पर्यायी मार्गांची दुरूस्ती व आवश्यक सुविधां उपलब्ध करुन देण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत ठाण्याचे प्रभारी व पालघरचे जिल्हाधिकारी नरनावरे यांनी सांगितले की, आठवडाभरात किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत पर्यायी रस्त्यांच्या दुरुस्तीची अत्यावश्यक कामे केली जातील व तत्काळ अधिसूचना काढून मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीचे काम सुरु केले जाईल. पर्यायी रस्ते व्यवस्थित नसल्याने अपघात झाला तर मोठी पंचाईत होऊ शकते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी घेतलेली भूमिका योग्य असून त्यानुसार काम सुरु करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील पर्यायी रस्तेही नादुरुस्त असल्याचे गंभीर व धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. रस्त्यांची अवस्था जर खराब आहे तर वाहतूक विभागाने इतक्या तातडीने मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीची घोषणा कशी केली व पोलिसांनी कामाची अधिसूचना जिल्हाधिकारी यांनी काढण्याच्या स्तरावर पर्यायी रस्ते नादुरुस्त असल्याचे सांगत दुरुस्तीच्या कामात खोडा का घातला, असा सवाल प्रवासी करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा यामुळे पर्दाफाश झाला असून वाहतूक पोलीस, ग्रामीण पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात दुरुस्तीची तारीख जाहीर होईपर्यंत ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेच पर्यायी रस्ते नादुरुस्त असल्याचे झाले उघड
कल्याण शीळ रोडने काटई, पत्रीपूल, कल्याण दुर्गाडी सर्कल पूल, कोनगाव, रांजनोली नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग ३ वरून भिवंडीकडे जाणाºया मार्गाच्या दुरूस्तीसह रबाळे एमआयडीसीमार्गे रबाळेनाका, ऐरोली पटनी सर्कल, डावीकडे वळून ऐरोली सर्कल आदी रस्त्यांची दुरूस्ती अपेक्षित आहे. शिवाय टेंननाका वसईमार्गे वाकोडा टोलप्लाझा, वाडागाव याठिकाणी उजवीकडे वळण घेऊन, कवाड टोलनाका, नदीनाका पुलावावरून डावीकडे वळण घेऊन चाविंद्रा, वडापा, मुंबई-नाशिक हायवेवरून उजवीकडे वळण घेऊन पुढे येवाईनाका याठिकाणी डावीकडे वळण घेऊन पाइपलाइनमार्गे, सावध चौक-उजवीकडे वळण घेऊन गांधारी पुलावरून-आधारवाडी सर्कल-उजवीकडे वळण घेऊन दुर्गाडी पत्रीपूलमार्गे टाटा हाऊस-बदलापूर चौक येथून डावीकडे वळण घेऊन खोणी सर्कलमार्गे उजवीकडे वळण घेऊन तळोजामार्गे एमआयडीसी नावडाफाट्याकडून डावीकडे वळण घेऊन कळंबोली सर्कलवरून रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत इच्छीतस्थळी पोहोचतील. तत्पूर्वी या मार्गांची दुरूस्ती गरजेची आहे.
चंचोटी येथून जेएनपीटी येथे भिवंडी, नारपोलीमार्गे जाणारी वाहने पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत बंद राहणार आहे. परंतु, चिंचोटीवरून नारपोली-भिवंडी परिसरात येणाºया अवजड वाहनांना मालोडी टोलनाकामार्गे पूर्णवेळ अंजूरफाटा आदी मार्गांची दुरूस्ती होणे गरजेची आहे. याशिवाय वाघोडबंदर रोडने कापूरबावडी-कोपरी पूल-मुलुंड चेकनाका-ऐरोली टोलनाका मार्गे-ऐरोली टोलनाकामार्गे ऐरोली सर्कल-डावीकडे वळण घेऊन पटनी जंक्शन-उजवीकडे वळण घेऊन रबाळेनाका, महापे सर्कल-उरणफाटाकडे जाताना आवश्यक दुरूस्ती व विद्युत पुरवठयाची गरज आहे.
मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम, बेअरिंग मजबूत करणे आणि बदलणे, काही डेस्कलॅब तोडून नवीन बांधणे ही कामे केली जाणार आहेत. हा रस्ता मुख्यत: जेएनपीटीकडून येणाºया आणि जाणाºया अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. सोबत ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठी चारचाकी आणि दुचाकी वाहनचालक याचा वापर करतात.
मुंब्रा वाय जंक्शन ते रेतीबंदर असे सात किलोमीटर रस्त्यांचे काम करण्याबाबत वारंवार संबंधीत यंत्रणांच्या बैठकी झाल्या होत्या. तसेच पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने या दुरूस्तीला हिरवा कंदील दिल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांनी अधिसूचना काढून मंगळवारपासून या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे गुरुवारी १९ एप्रिल पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. मात्र, मंगळवारी मुंब्रा बायपासवरून वाहतूक सुरू होती. त्यामुळे ठाणे तसेच नवी मुंबईत पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवला नसल्याने वाहनचालकांना तूर्त दिलासा लाभला आहे.