ठाणेकर रंगकर्मींना सरकारने दाखवली मुंबईची वाट, घाणेकर नाट्यगृहाच्या दुरूस्तीच्या घोळापायी हक्काचा प्रेक्षक गमवल्याचे शल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:30 AM2017-10-25T03:30:10+5:302017-10-25T03:34:18+5:30
ठाणे : नाट्यगृह उपलब्ध न झाल्याने ठाणे शहरात दरवर्षी होणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ठाणेकर प्रेक्षकांनी गमावली आहे.
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : नाट्यगृह उपलब्ध न झाल्याने ठाणे शहरात दरवर्षी होणारी हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ठाणेकर प्रेक्षकांनी गमावली आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या नाट्य संस्थांना नाटक सादर करण्यासाठी मुंबईतील साहित्य संघात जावे लागणार असल्याने रंगकर्र्मींनी नाराजी व्यक्त केली.
५७ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सहभागी होणा-या ठाण्यातील नाट्यसंस्थांना महाराष्ट्र शासनाने मुंबईत नाटक सादर करण्यास भाग पाडल्याने ठाण्यातील नाट्यकर्मींनी आक्रोश व्यक्त केला. ठाणे शहरात अनेक वर्षांपासून या स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येत होती. मात्र यावर्षी घाणेकर नाट्यगृहाची दुरुस्ती सुरू असल्याने ठाणे शहरात सादर होणारी रायगड आणि नवी मुंबंईतील नाट्यसंस्थांसाठी पनवेल हे नवे केंद्र यावर्षी पहिल्यांदाच सुरू करण्यात आले आहे. ठाणे शहरातील नाट्य संस्थांना मात्र मुंबईची वाट दाखवण्यात आली आहे.
घाणेकर नाट्यगृहाला गडकरी रंगायतन किंवा ठाणेनजीकच्या मुलुंडमधील कालीदास नाट्यगृहाचा पर्याय होता. मात्र तिथे ही स्पर्धा न घेता ठाणे शहराशी असलेल्या हौशी नाट्याचे नातेच शासनाने तोडून टाकल्याच्या भावना रंगकर्र्मींनी व्यक्त केल्या. या निमित्ताने आम्ही ठाण्यातील हक्काचा प्रेक्षक गमावला असल्याची खंत ‘लोकमत’शी बोलताना अनेकांची व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ५७ वी हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ नोव्हेंबरपासून होणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरचे काम सुरू असल्याने या ठिकाणी असणाºया ‘ठाणे केंद्रा’ची ओळखच संपवण्यात आली आहे. कल्याण केंद्रावर सादर होणारी नाटके यावर्षी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात सादर होणार आहेत.
ठाणेकर नाट्यसंस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठीचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. याशिवाय मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागणार आहे. हे व्यावसायिक कलाकार नाही, हौशी कलाकार आहे. त्यामुळे त्यांना इथून मुंबईला जाऊन नाटक सादर करण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागणार आहे, असे मत गेली अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होणा-या एका नाट्यकर्मीने मांडले.
ठाणे केंद्रासाठी नाट्यगृह ठाण्यात उपलब्ध करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या नाट्यसंस्थांना मुंबईत घुसविणे चुकीचे आहे. वर्षानुवर्षे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या स्पर्धा होतात, हे माहित असताना पालिकेला तसे आधीच सांगणे गरजेचे होते. त्यातून दुरुस्तीचे काम जलद झाले असते.असा मुद्दा मांडतानाच मुंबईला पाठविल्यामुळे खर्च वाढलाच, पण राज्य नाट्य स्पर्धेत उतरणा-या स्थानिक नाट्य संस्थांचा प्रेक्षक असतो, प्रोत्साहन देणारे रसिक आम्ही गमावला, याला फक्त शासनाचा अनागोंदी कारभार जबाबदार आहे, अशा भावना नाट्यसंस्था आणि रंगकर्मींनी व्यक्त केल्या.