जन्म, स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षलागवड करून हरित महाराष्ट्रचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:45 AM2018-03-18T00:45:06+5:302018-03-18T00:45:06+5:30
‘वृक्षांची जोपासना हीच खरी निसर्गाची उपासना’ या सूत्राद्वारे महाराष्ट्राचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के करून हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव वृक्षवेलींनी सजविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
- नारायण जाधव
ठाणे : ‘वृक्षांची जोपासना हीच खरी निसर्गाची उपासना’ या सूत्राद्वारे महाराष्ट्राचे वनक्षेत्र २० टक्क्यांवरून ३३ टक्के करून हरित महाराष्ट्र ही संकल्पना राबविण्यासाठी राज्यातील प्रत्येक गाव वृक्षवेलींनी सजविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक घरांत मुल जन्माला येणे असो वा मंगलकार्यांचा आनंद साजरा करणे ते कुणाचे निधन झाल्यावर त्या मृतांच्या स्मृती जपण्यासाठी वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या मदतीने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे.
पर्यावरण समतोल राखण्यासाठी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रानमळा या गावाने लोकसहभागातून गावात कुणाचा जन्म, विवाह वा देवाज्ञा झाल्यास आठवण म्हणून वृक्षलागवड करून गाव हिरवेगार केले. हे उदाहरण लक्षात घेता ग्रामविकास विभागाने हा हरित महाराष्ट्र कार्यक्रम हाती घेतला आहे.
अशी करणार रोपांची उपलब्धता
संबधित ग्रामपंचायतील दानशूर व्यक्ती, सीआरर फंड किंवा सामाजिक वनीकरण विभागाच्या वनमहोत्सवातून सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून द्यावीत. यासाठीचा निधी आपल्या उत्पन्न स्त्रोतांतून भागवावा.
वृक्षलागवडीसाठी १ जुलै ते ३० जून हा कालावधी गृहीत धरला असून या कालावधीत गावात किती रोपे लागतील, याचा अंदाज ग्रामपंचायतीने घ्यायचा आहे. मात्र, रोपांचे वाटप १ जुलै या दिवशी एकदाच करावे. नंतर संबधित व्यक्तीने त्या रोपाचे वाटप १ ते ७ जुलै रोजी या काळात करून तशी नोंद ग्रामपंचायतींच्या रजिस्टरमध्ये करून त्याचे संवर्धन करायचे आहे.
असा आहे पंचसूत्री कार्यक्रम
१ शुभेच्छा वृक्ष : वर्षभरात गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाचे स्वागत संबधित कुटुंबाला फळझाडांची रोपे देऊन करावे. अशी कुटुंबे त्या झाडाचे लागवड करून संवर्धन करतील.
२ शुभमंगल वृक्ष : गावात ज्यांचे विवाह होतील, त्यांना फळझाडांची रोपे देऊन शुभआशिर्वाद द्यावेत.
३ आनंदवृक्ष : वर्षभरात जी मुले दहावी,बारावी उत्तीर्ण होतील, गावातील ज्या तरूण-तरुणींना नोकरी लागेल वा जे निवडून येतील त्यांना अशा आनंदाच्या क्षणी फळझाडांची रोपे देऊन त्यांचे स्वागत करावे.
४ माहेरची झाडी : गावातील ज्या कन्यांचे विवाह होतील, त्यांना सासरी जाऊन झाडांची रोपे देणे अवघड असते. या विवाहित कन्येच्या माहेरच्या लोकांना झाडांचे रोप देऊन स्वागत करावे. संबधित कुटुंब रोपांचे लेकीप्रमाणे जोपासना करतील, अशी अपेक्षा आहे.
५ स्मृती वृक्ष : एखाद्या गावात ज्या व्यक्तीचे निधन होते, त्या कुटुंबाला झाडांचे रोप देऊन श्रद्धांजली अर्पण करावी. अशा रोपाची लागगड करून आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृती संबधित कुटुंब जपतील, असा विश्वास ग्राम विकास विभागाने व्यक्त केला आहे.