हाजुरी, लुईसवाडीत मिळणार शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:40 AM2019-07-17T00:40:35+5:302019-07-17T00:40:39+5:30
ठाणे महापालिकेतर्फे बृहन्मंबई महापालिकेच्या माध्यमातून हाजुरी, लुईसवाडी आणि परिसरात आता प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे बृहन्मंबई महापालिकेच्या माध्यमातून हाजुरी, लुईसवाडी आणि परिसरात आता प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून बृहन्मुंबई महापालिकेने मान्यता दिल्याने येत्या आठवडाभरात नवीन जलजोडणी करून शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे.
३० वर्षांपासून हाजुरी, लुईसवाडी आणि रामचंद्रनगर या परिसराला मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीतून २२.५० दशलक्ष लीटर प्रक्रिया न केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये तेथे गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या
तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या स्तरावर गेल्या वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. यासाठी महापालिकेने नवीन जलजोडणी आकार आणि अनामत म्हणून ३ कोटी १६ लाखांची अनामत रक्कमही भरली आहे. दरम्यान, जलजोडणीच्या ठिकाणी आवश्यक असणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जलमापक उभारण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे.
>ठाण्यात आज पाणीकपात
ठाणे महापालिकेतर्फे सर्व्हिस रोड, धर्मवीर मार्ग (डी-पॉर्इंट) या ठिकाणी बीएमसी जलवाहिनीवर जलमाफक बसविणे तसेच हाजुरी येथील रॉ वॉटर पाणीपुरवठा बंद करण्याकरिता क्रॉस कनेक्शनचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९ पर्यंत शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्वत:च्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून बुधवारी बंगला वॉटर डिस्ट्रिक्ट मधील नामदेववाडी, पाचपाखाडी, टेकडी परिसर, आराधना, सेंट जॉन स्कूल परिसर, तसेच गावदेवी वॉटर डिस्ट्रिक्टमधील बी कॅबिन, दादा पाटील वाडी, स्टेशन परिसर, चेंदणी कोळीवाडा, राम मारु ती रस्ता आदी भागांत पाणी नसेल.