कनिष्ठ शिक्षकावर मुख्याध्यापकाचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 07:57 PM2017-12-04T19:57:13+5:302017-12-04T20:05:41+5:30

ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा एक कनिष्ठ शिक्षक प्राणघातक हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री या शिक्षकावर चौघांनी तलवारीने हल्ला चढविला होता. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराविरूद्ध या शिक्षकाने शासन दरबारी तक्रारी केल्या होत्या. याच कारणातून आपल्यावर हल्ला चढविल्याचा आरोप शिक्षकाने केला आहे.

Headmaster booked for assault on junior teacher | कनिष्ठ शिक्षकावर मुख्याध्यापकाचा प्राणघातक हल्ला

कनिष्ठ शिक्षकावर मुख्याध्यापकाचा प्राणघातक हल्ला

Next
ठळक मुद्देशिक्षक गंभीर जखमीमुख्याध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखलशासनाकडे तक्रारी केल्यामुळे हल्ला केल्याचा आरोप

ठाणे : सावरकरनगरातील ज्ञानोदय हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने रविवारी रात्री प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप शाळेच्याच एका शिक्षकाने केला आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिक्षकाच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरूद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ज्ञानोदय हिंदी विद्यालयामध्ये महाजन प्रजापती हे कनिष्ठ शिक्षक म्हणून नोकरीला आहेत. या विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मिश्रा यांच्या विरोधात त्यांनी शासनदरबारी अनेक तक्रारी केल्या आहेत. मिश्रा हे नऊ वर्षांपासून शाळेत एकही दिवस हजर न राहता केवळ मस्टरवर सह्या करून वेतन घेत असल्याची प्रजापती यांची तक्रार होती. मिश्रा यांचे वागळे इस्टेटमध्ये स्वत:चे विद्यालय असून, त्यांचा शिक्षकांना जाच असल्याचा गंभीर आरोपही प्रजापती आणि अन्य तक्रारदारांनी केला होता.
या पार्श्वभूमिवर रविवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास महाजन प्रजापती जेवण झाल्यानंतर सावरकर नगरातील पानाच्या दुकानावर गेले असता, चौघांनी त्यांच्यावर जबर हल्ला चढवला. तलवारीने केलेल्या मारहाणीत प्रजापती गंभीर जखमी झाले. यावेळी मुख्याध्यापक मिश्राही तिथे होते, असा आरोप प्रजापती यांनी केला. या हल्ल्यात प्रजापती गंभीर जखमी झाले असून, खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी सांगितले.
प्रजापती यांच्यावर हल्ला करणारे अन्य आरोपी कोण होते, याची चौकशी वर्तकनगर पोलिसांकडून सुरू आहे. प्रजापती यांच्यावर मुख्याध्यापक रमेश मिश्रा यांनी स्वत: हल्ला केला की भाडोत्री गुंडांकडून करून घेतला, हा तपासाचा भाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. कनिष्ठ शिक्षक महाजन प्रजापती यांनी मुख्याध्यापक मिश्रा यांच्याविरोधात शिक्षण खात्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींचा पाठपुरावाही ते करीत होते. या पार्श्वभूमिवर प्रजापती यांच्यावर झालेला हल्ला आणि घटनास्थळी मुख्याध्यापक मिश्रा यांच्या उपस्थितीबाबत त्यांनी दिलेला जबाब, या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन आंब्रे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Headmaster booked for assault on junior teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.