"सलाम साहित्यिक" या संकल्पेनेतून "चिं.वि.जोशी" व "व्यंकटेश माडगूळकर" या ज्येष्ठ साहित्यिकांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:31 PM2018-04-30T16:31:50+5:302018-04-30T16:33:28+5:30
अभिनय कट्ट्यावर "सलाम साहित्यिक" या संकल्पेनेतून "चिं.वि.जोशी" व "व्यंकटेश माडगूळकर" या ज्येष्ठ साहित्यिकांना आदरांजली वाहिली.
ठाणे : रविवारी ३७४ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्याचे विशेष आकर्षण होते ते म्हणजे प्रसिद्ध साहित्यीकांच्या कथांवर आधारित "द्विपात्रीचे सादरीकरण". सर्वप्रथम मोहिनी ओजाळे या जेष्ठ प्रेक्षक प्रतिनिधींच्या हस्ते अभिनय कट्ट्याचे दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यांनंतर शुभांगी गजरे हिने "आम्ही म्हणून सहन करतो" या एकपात्रीचे सादरीकरण केले. तसेच सई कदम हिने "साता-याची गुलछडी" हि लावणी व पूर्वा तटकरे हिने "हवा हवाई" या गाण्यावर दिलखेच असे नृत्य सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली.
आजपर्यंत अभिनय कट्ट्याच्या माध्यमातून ठाण्यातील तसेच मुंबई महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. केवळ एकांकिका, नाटकच नव्हे तर अनेक ज्येष्ठ साहित्यिकांच्या विविध कथांचे नाट्यरूपांतर करून द्विपात्रीच्या माध्यमातून सादरीकरण करण्यात आले. चिं.वि. जोशी व व्यंकटेश यांच्या लेखनातून साकारलेल्या कथांचे अभिनय कट्ट्याच्या अॅकॅडमीतील कलाकारांनी द्विपात्री मध्ये रूपांतर करून अतिशय सुरेख सादरीकरण केले. लेखकाने लिहिलेली कथेतील व्यक्तीरेखा कलाकारांनी साकारणे व अनेक वर्षांपासून ती व्यक्तीरेखा रसिक प्रेक्षकांनी पहाणे हा एक दुर्मिळ योग अभिनय कट्ट्यावर पाहायला मिळाला. चिं.वि.जोशी, व्यंकटेश माडगूळकर या दोन्ही लेखकांची लिखाणाची वेगळी पद्धत त्यांच्या कथेतील विविध व्यक्तीरेखा त्या वेळचा काळ, गावातील भाषा, अशा अनेक गोष्टी सातत्याने या दोन्ही साहित्यकांची आठवण करून देत होत्या. चिं.वि. यांची "नव-याच्या सहा जाती" या कथेतील सहा वेगवेगळ्या प्रकारचा नव-याचा स्वभाव व त्यातून संसारात उमटणारे पडसाद हे न्यूतन लंके व साक्षी महाडिक यांनी सादर केले. चि . वि .जोशी यांच्याच "सक्रिय विनोद" या कथेतील सासू व सुनेच्या दैनंदिन जीवनातील खट्याळ गोष्टीच वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्तीरेखा सादर करीत प्रतिभा घाडगे व रोहिणी राठोड यांनी साकारले. व्यंकटेश मढगूळकर यांच्या "झेल्या" या गाजलेल्या कथेचे द्विपात्री सादरीकरण म्हणजे अभिनय कट्टयाचे प्रमुख आकर्षण ठरले. गावातील खोडकर मुलाचे आपल्या गुरुजींसोबत असलेले भावनिक नाते व कालांतराने गुरुजी शाळा सोडून जात असताना झेल्याची अतिशय केविलवाणी अवस्था. या गुरुजी व विद्यार्थी यांच्या नातेसंबंधांवर आधारीत या द्विपात्रीचे सादरीकरण सचिन हिनुकले व लवेश दळवी यांनी उत्तमरित्या केले. प्रेक्षकांची मिळालेली उत्फुर्त दाद हेच या द्विपात्रीचे यश ठरले. त्यानंतर शुभांगी भालेकर व रोहिणी थोरात यांची"जिथे ते तिथे मी", रोहित मुणगेकर व कुंदन भोसले यांनी सादर केलेली "दक्षता" या सर्वच साहित्यिकांच्या कथेचे सादरीकरण वेगवेगळ्या काळात घेऊन गेले. ३७४ क्रमांकाच्या कट्ट्याचे निवेदन वीणा छत्रे हिने केले. अभिनय कट्ट्याच्या शेवटी कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी प्रेक्षकांसोबत संवाद साधला.