आयुक्त नोकरदार नाही तर स्वत:ला हुकमशहा समजतात, महापौरांनी डागली आयुक्तांवर तोफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 04:13 PM2018-03-27T16:13:43+5:302018-03-27T16:13:43+5:30
ठाणे महापालिका आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे यापुढे माझा अपमान केला गेला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशारा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांना दिला आहे.
ठाणे - महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरुन आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुध्द आता आणखीनच पेटण्याची चिन्हे आहेत. आयुक्त हे ठाणेकरांचे नोकरदार आहेत, परंतु ते हेच विसरले असून ते हुकमशाही पध्दतीनेच काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी असे सुतोवाचही त्यांनी केले आहेत. तसेच यापुढे जर माझा अपमान झाला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन असा इशाराही त्यांनी दिला.
मंगळवारी महासभा सुरु झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नउत्तरांच्याच तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करुन बुधवारी पुन्हा ही सभा लावण्यात आली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी या सभेला उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे सभा काही काळासाठी तहकूब करण्यात आली. विशेष म्हणजे एकीकडे महासभा सुरु असतांनाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक लावली. मार्च अखेरच्या कामांमध्ये प्रशासकीय अधिकारी व्यस्त असून काही अधिकारी विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत अशी सबब प्रशासनातर्फे देण्यात आली. त्यामुळे सभेसाठी अधिकारी येणार नाही हे स्पष्ट झाले. त्यानंतर आता महासभा केव्हा लावायची हे मी ठरविणार असल्याचेही महापौरांनी प्रशासनाला सुनावले होते. आता या पुढे जाऊन महापौरांनी पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप लावले आहेत. पालिका आयुक्तांच्या हुकूमशाहीचा मात्र चांगलाच समाचार घेतला आहे. जे सरकारी नोकर आहेत ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरा समोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले आहे. नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपिस्थत राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत मात्र वर्तणूक सुधारली नाही तर ते मी वापरू शकते, सभागृहात हक्कभंग ही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उध्वस्त करून शहर स्मार्ट कसे होणार? असे विविध प्रश्न उपस्थित करत महापौरांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर तोफ डागली तर ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्धवस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते अशी भुमीका महापौर शिंदे यांनी यावेळी मांडली.
निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही गप्प -
दुर्देवाने आज नगरसेवक देखील खुलेपणाने प्रशासनाला विरोध करायला घाबरत आहेत. काही अडचणीमुळे कदाचित लोकप्रतिनिधी आयुक्तांसमोर बोलायला घाबरतात किंवा खोट्या केस दाखल करू नये म्हणूनही लोकप्रतिनिधी शांत बसतात. मात्र जनतेचे प्रश्न मी मांडू शकत नाही तर त्या खुर्चीत बसण्याचा अधिकार काय आहे मला ? त्यामुळे पक्षाच्या भूमिकेपेक्षा जनतेचे प्रश्न महत्वाचे असून ते मांडतच राहणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.