घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला अमानुष मारहाण, मुलीला दिले चटके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 02:02 PM2017-10-26T14:02:40+5:302017-10-26T15:17:02+5:30
शहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या हाय प्रोफाईल सोसायटीत राहण्याऱ्या अनिल व सीमा तलवार या दांम्पत्याने त्यांच्या घरी घर काम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला अमानूष मारहाण केली आहे.
कल्याण- शहराच्या पश्चिम भागातील मोहन प्राईड या हाय प्रोफाईल सोसायटीत राहण्याऱ्या अनिल व सीमा तलवार या दांम्पत्याने त्यांच्या घरी घर काम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला अमानूष मारहाण केली आहे. तिला चक्क चटके देऊन तिचा छळ करण्यात आला आहे. मुलीने कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करुन पळ काढल्याने हा प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तलवार दांम्पत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
तलवार यांच्या घरी काम करणाऱ्या अल्पवयीन 15 वर्षीय मुलीला तलवार यांनी दिल्लीहून आणले होते. ती त्यांच्या घरी काम करीत होती. पीडित मुलीला तलवार यांनी मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की तिच्या अंगावर सगळे व्रण उठले आहे. तिच्या अंगाला चटके देण्यात आलेले आहेत. पीडित मुलगी या सगळ्या त्रासाला कंटाळून कशीबशी तलवार यांच्या तावडीतून बाहेर पडली. पीडित मुलगी बाहेर पडल्यावर नागरीक व समाजिक कार्यकर्ते मनोज ठाकूर यांच्या मदतीने पोलीस नियंत्रम कक्ष गाठले. पोलीस नियंत्रण कक्षाने तिला खडकपाडा पोलीस ठाण्यास पाठविले. खडकपाडा पोलीस ठाण्यात मुलीला ठेवण्यात आलं.
पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला आहे. सुरुवातीला पोलिसानी तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली नाही. मात्र सामाजिक कार्यकर्ते ठाकूर यांनी पोलिसांचा होरा पाहून पुढील हालचाली करण्याची वार्ता केल्यावर पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली आहे. पीडित मुलगी ही मूळची झारखंड येथील आहे. तिला एका प्लेसमेंट चालक अजयकुमार याने मुलीला दिल्ली येथे कामाला लावण्याचे आमिष दाखवून दिल्लीत आणले. दिल्लीहून तलवार यांनी मुलीला कल्याणच्या घरी घरकामासाठी आणले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुलीसोबत अन्य कोणता प्रकार झाला आहे का याचा संशय व्यक्त केला जात असून त्या अनुशंगाने तपास सुरू झाला आहे.
पोलिसांकडे मुलगी सज्ञान असल्याचे कागदपत्रे सादर केली असली तरी मुलीनेच स्वत: ती पंधरा वर्षे वयाची असल्याचे सांगितल्याने वयाचा पेच आहे. तो वैद्यकीय तपासणी अंती सुटणार आहे. दरम्यान यासंदर्भात अनिल तलवार व सीमा तलवार यांनी मुलगी अठरा वर्षाची असून ती सज्ञान आहे. मुलीने केलेले आरोप खोटे व निराधार असल्याचं म्हटलं आहे.