नवीन ठाण्याला स्थानिकांचा प्रखर विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:53 AM2019-03-11T00:53:38+5:302019-03-11T00:53:47+5:30
ठाणे शहरापासून जवळच असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएने पावले उचलली आहेत
- अजित मांडके, ठाणे
ठाणे शहरापासून जवळच असलेल्या खारबाव, पायगाव, पाये, शिलोत्तर, मालोडी, नागरे या महसुली गावांचा विकास नवीन ठाणे म्हणून करण्यासाठी ठाणे महापालिका आणि एमएमआरडीएने पावले उचलली आहेत. तूर्तास दळणवळणाची कोणतीही सुविधा येथे नसल्याने खाडीवरील प्रस्तावित पूल हा या परिसराचे भविष्य बदलवू शकेल. असे असले तरी, येथील नागरिकांचा नव्या ठाण्याला ठाम विरोध आहे. नवीन ठाण्याची संकल्पना उत्तम असली, तरी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना यंत्रणेला करावा लागणार आहे.
महापालिका आणि एमएमआरडीएमार्फत नवीन ठाणे कसे असेल याची दमदार संकल्पना मांडण्यात आली आहे. प्रत्यक्षात येथील रहिवाशांना ही संकल्पना कितपत पचनी पडणार आहे, याचा अभ्यास ठाणे पालिकेसह एमएमआरडीएलाही करावा लागणार आहे. मोकळ्या जमीनींवर मोठमोठे विकासाचे इमले बांधण्याचा घाट या यंत्रणांकडून घातला जात असला, तरी येथील रहिवाशी मात्र या नव्या संकल्पनेच्या विरोधात एकवटू लागले आहेत.
येथील खारबाव गावाची लोकसंख्या ही १० हजारांच्या आसपास असून इतर आजूबाजूच्या गावांची लोकसंख्या ही साधारणत: दीड ते अडीच हजारांच्या घरात आहे. परंतु येथील सर्वच रहिवासी नवीन ठाण्याच्या विरोधात एकवटले असून, याविरोधात आता गावागावात मिटींग होऊ लागल्या आहेत. नवीन ठाणे विरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यासाठी रहिवाशांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. विकास कोणीही थोपवू शकत नाही. परंतु हा विकास करताना आमचे गावठाण क्षेत्र, शांतता, जमिनी, शेती, ग्रामीण संस्कृती आणि जीवनशैली हिरावून घेतली जाणार आहे. त्यामुळेच या नव्या ठाण्याला आमचा प्रखर विरोध असल्याची भूमिका येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
गावपण हिरावले जाणार?
सध्या येथील प्रत्येक गावाने आपली ओळख टिकविली आहे. त्यांनी आपले गावपन टिकविले आहे. परंतु नवीन ठाण्याचा विकास झाल्यास येथील सर्वच गावांचे गावपन हिरावले जाणार आहे. मोठमोठे इमले येथे उभारले जाणार आहेत. त्यामुळे समृध्दीने नटलेल्या या गावांचे गावपन हिरावले जाणार आहे. येथील गावकऱ्यांना याची चिंता मोठ्या प्रमाणात सतावत आहे.
टॅक्स वाढणार
सध्या येथील प्रत्येक घरासाठी वार्षिक ५०० ते १ हजारापर्यंत घरपट्टी आहे. नवीन ठाणे म्हणून येथील गावे विकसित झाल्यानंतर घरपट्टी वाढणार आहे. त्याचा भुर्दंड गावकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.
रेल्वे ट्रॅकपासून आर झोन, रस्त्याच्या पलीकडे ग्रीन झोन
रेल्वे ट्रॅकपासून वसई - भिवंडी हायवेपर्यंत आर झोन घोषीत करण्यात आला आहे. त्यामुळे विकासाची संधी ही याच भागात असणार आहे. रस्त्याच्या पलिकडे मात्र ग्रीन झोन घोषीत करण्यात आला आहे. याच ठिकाणी फॉरेस्ट झोनसुध्दा आहे. त्यामुळे येथे विकासाला फारशी चालना मिळणार नाही. परंतु याच ठिकाणी पार्क, विरंगुळा केंद्र, उद्यान उभारण्यासाठी शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आहेत.