गोवर-रुबेला लसीकरणावर आंतरराष्ट्रीय निरीक्षकांची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:51 AM2018-12-03T00:51:27+5:302018-12-03T00:51:30+5:30
जिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
ठाणे : जिल्ह्यातील सुमारे २६ लाख ८५ हजार १५ बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार, लसीकरण सुरळीत होत आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी अटलांटा यूएस येथील आंतरराष्टÑीय निरीक्षक डॉ. कोलीन या ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यांनी ठाणे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास भेट देऊन या मोहिमेची पाहणी केली
जिल्हाभरातील मुलामुलींना गोवर-रुबेला लसीकरण करण्याची मोहीम जागतिक आरोग्य संघटनेद्वारे हाती घेण्यात आली आहे. देशातील अन्य राज्यांमध्ये ही मोहीम आधीच पार पडली. आता उत्तर प्रदेश आणि महाराष्टÑात ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेवर आंतरराष्टÑीय निरीक्षकांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी अटलांटा यूएस येथील ‘एनडीसी’ या आरोग्य संघटनेच्या डॉ. कोलीन यांनी या मोहिमेच्या पाहणीस प्रारंभ केला. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि शासनाच्या नियंत्रणातील रुग्णालयांमधील लसीकरणाच्या कामाचा आढावा घेतला जात आहे. संबंधित आरोग्य यंत्रणांकडून लसीकरणाचे काम गांभीर्याने होत आहे की नाही, याकडे त्या कटाक्षाने लक्ष देत असून वेळोवेळी कामाचा आढावा घेत आहेत.
ठाणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या पाहणी दौऱ्यानंतर त्यांनी शनिवारी सायंकाळी ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व सिव्हील रुग्णालयास भेट देऊन कामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीष रेघे यांनी डॉ. कोलीन यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी जिल्हाभरातील वैद्यकीय अधिकाºयांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांच्या नियंत्रणात ठाण्यासह रायगड, पालघर या तीन जिल्ह्यांत लसीकरणाचे काम सुरू आहे.
>१६ टक्के लसीकरण
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४२ हजार ३६८ म्हणजे १६ टक्के मुलांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. ज्या भागात लसीकरणास प्रतिसाद कमी आहे, तिथे वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रेघे यांनी सांगितले.