ठाण्यातील ब्रह्माण्ड कट्ट्यावर ओळख पुर्वांचलची ईशान्य भारताचे अंतरंग कार्यक्रम संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 04:32 PM2018-01-22T16:32:20+5:302018-01-22T16:35:46+5:30
ब्रह्माण्ड कट्ट्यावर या रविवारी जयवंत कोंडविलकर यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून ईशान्य भारताचे अंतरंग उलगडवून दाखविण्यात आले.
ठाणे : ब्रम्हांड कट्टा आयोजित "ओळख पुर्वांचलची ईशान्य भारताचे अंतरंग" हा मुलाखतीचा व महीलांसाठी हळदी कुंकुचा कार्यक्रम रविवारी सांज स्नेह सभागृहात झाला. कट्टयाच्या सुरुवातीला स्थानिक कलाकारांनी आपली कला सादर करुन प्रमुख पाहुण्याच्या हस्ते दिप प्रज्वलन व भारत मातेला पुष्प अर्पित करत सावन कुमार सुपे यांनी देश भक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
पुर्वांचलमधे गेल्या ४० पेक्षा जास्त वर्षांपासून अविरत काम करत असलेल्या - पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे कार्यवाहक जयवंत कोंडविलकर यांची मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात छायाचित्र आणि पुर्वांचल भागाची माहिती सांगून झाली. तिथला भौगोलिक भाग, संस्कृती, राहणीमान, आतंकवादी कारवायांपासून होणार त्रास, शासनाकडून इतकी वर्षे दुर्लक्षित राहिल्यामुळे उभे राहिलेले प्रश्र आणि ह्याच परिस्थितीतून वाढणारी घुसखोरी … अशा अनेक विषयांवर माहितीपर प्रकाश टाकला.मुलाखतीत अत्रे कट्टयाच्या संपदा वागळे यांनी त्यांचा कोकणातल्या रत्नागिरी जिल्हा ते पुर्वांचल प्रवास, लहानपणीचे पुर्वांचल मधले अनुभव, गुरूवर्य भैय्याजी काणे यांचे सुरूवातीचे दिवस, नंतर वृद्धींगत होणारं कार्य, अशा विविध पैलूंवर प्रश्र विचारून माहिती घेतली. "घरात देवाचं स्थान ईशान्येकडे असतं हे माहिती असताना, भारताच्या ईशान्येत वसलेल्या देवाकडे आपण कित्येक वर्ष दुर्लक्ष करतोय," ही तळमळ जयवंत यांनी व्यक्त केली. प्रत्येक भारतीयांने उठून पुर्वांचलात जावं ही अपेक्षा नाहीये तर त्यांना प्रत्येकाने आपलंसं करावं, त्यांच्या शिक्षणात आणि विकासात शक्य तितकी मदत करावी, ही अपेक्षा असल्याचं सांगितलं. प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुर्वांचलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करू शकतो हे सांगितलं. कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम हे वैशाली भागवत हीने गीत गाऊन झाली. यावेळी ब्रह्मांड कट्टयाच्यावतीने प्रगती जाधव व स्नेहल जोशी यांनी हळदी कुंकू सोहळा आयोजित करुन महीलांना वाण व तिळगुळ दिले.