असा झाला मोपलवार यांचा मांगलेशी संपर्क, घटस्फोट प्रकरणातून संपर्कात, डिटेक्टिव्ह बनून उकळले पैसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 01:54 AM2017-11-04T01:54:50+5:302017-11-04T01:54:58+5:30
वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे संभाषण व मोबाइल कॉल रेकॉर्ड करून ते वृत्तवाहिन्यांना पुरवणाºया व ही बदनामी थांबविण्याकरिता तब्बल १० कोटींच्या खंडणीची मागणी करणा-या सतीश सखाराम मांगले (२८) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने डोंबिवलीतून गुरुवारी रात्री अटक केली आहे.
ठाणे : वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे संभाषण व मोबाइल कॉल रेकॉर्ड करून ते वृत्तवाहिन्यांना पुरवणाºया व ही बदनामी थांबविण्याकरिता तब्बल १० कोटींच्या खंडणीची मागणी करणा-या सतीश सखाराम मांगले (२८) याला ठाणे खंडणीविरोधी पथकाने डोंबिवलीतून गुरुवारी रात्री अटक केली आहे. प्रत्यक्षात मोपलवार यांच्याशी मांगलेचा संपर्क झाला तो त्यांच्या घटस्फोटप्रकरणी. डिटेक्टिव्ह म्हणून त्याला काम मिळाले. त्याने मोपलवार दाम्पत्याकडून डिटेक्टिव्ह बनून पैसे उकळले. शिवाय हळूहळू मोपलवार यांचे फोनवरील संभाषण रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या मांगलेने कॉम्प्युटर डिप्लोमाकरिता प्रवेश घेतला. मात्र, तोही अर्धवट सोडून दिला. त्यानंतर, तो आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा व्यवसाय सुरू केल्याची बतावणी करू लागला. मोपलवार दाम्पत्याच्या घटस्फोटाचे प्रकरण सुरू होते. त्या वेळी मोपलवार यांनी मांगले याची डिटेक्टिव्ह म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे मोपलवार यांच्यासारख्या वरिष्ठ सनदी अधिकाºयाच्या संपर्कात मांगले आला. या संपर्काचाही त्याने चांगला उपयोग करून घेतला.
मांगलेवर यापूर्वी बलात्कार, खंडणीचे गुन्हे
मांगले याच्यावर मुंबईत यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी एक वांद्रे पोलीस ठाण्यात आयटी अॅक्ट २०१२ नुसार खंडणीचा गुन्हा आहे, तर मीरा रोड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चित्रपटनिर्मितीच्या तयारीत
मांगले याचे पहिले लग्न झाले होते. मध्यंतरी, त्याने चित्रपटनिर्मितीसाठी प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली होती. त्या वेळी श्रद्धा त्याच्या संपर्कात आली. त्यानंतर, त्याची ओळख वाढली आणि ती त्याची पत्नी म्हणून सर्रास वावरू लागली.
मांगले प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होऊन लोकांना लुबाडू लागला, तेव्हा श्रद्धाही त्याच्याबरोबर या कृत्यात सहभागी होऊ लागली. तिने मोपलवार यांनाही ब्लॅकमेल करून धमकावण्यास सुरुवात केली होती, असे पोलिसांनी सांगितले.
३५ कॉल रेकॉर्ड सापडले
मांगले हा वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांतील वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधून त्यांचे कॉल व संभाषण रेकॉर्ड करत होता. मोपलवार यांना त्याच पद्धतीने जाळ्यात ओढणाºया मांगलेकडे ३५ कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना आढळले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या त्याच्या दोन लॅपटॉपमध्ये आणखी काही रेकॉर्डिंग सापडण्याची शक्यता आहे.
श्रद्धासाठी मीरा रोडला घेतले घर
मांगलेची पहिली पत्नी नालासोपारा येथे आईवडिलांसोबत राहते, तर दुसरी पत्नी श्रद्धा ही मीरा रोडला राहते. तो स्वत: डोंबिवलीत भाड्याने राहत होता. त्याच्याकडे चार आलिशान गाड्या आहेत. त्यातील दोन गाड्या यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलीस मांगलेच्या गेल्या काही वर्षांतील बँक खात्यांमधील व्यवहारांची चौकशी करणार आहेत.
गेल्या तीन वर्षांत मांगले जेव्हा मोपलवार यांच्याशी फोनवर बोलला किंवा प्रत्यक्ष भेटला, तेव्हा त्याने संभाषण रेकॉर्ड केले. नंतर मोपलवार यांना ब्लॅकमेल करू लागला. मांगले मोपलवार दाम्पत्याकडून डिटेक्टिव्ह या नात्याने पैसे घेत असल्याचा संशय पोलिसांना आहे.
तेलगी प्रकरणीही मोपलवार निर्दोषच
मांगलेमुळे बदनामीचे शुक्लकाष्ठ मागे लागलेल्या मोपलवार यांच्यावर हजारो कोटी रु पयांच्या बनावट मुद्रांक शुल्क घोटाळ्यातील कथित सहभागाबाबत आरोप झाले होते. मात्र, तेलगी घोटाळ्यात मोपलवार यांचा काडीमात्र सहभाग नसून ते या प्रकरणी तक्रारदार असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) जिल्हा तसेच उच्च न्यायालयात केले आहे.
तेलगीच्या अर्जावरून मोपलवारांना आकसाने समन्स पाठवण्यात आले असा आरोप करणाºया न्यायाधीशास ३ आॅक्टोबर २०११ रोजी सक्तीने निवृत्त करण्यात आले. या आदेशाच्या विरोधात सदर न्यायाधीशाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावर सुनावणी घेण्यात आली.
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने २ मार्च २०१६ रोजी फेटाळून लावली आहे, अशी माहिती मोपलवार यांच्या जनसंपर्क अधिका-याने दिली.
- दहावीपर्यंत शिकलेल्या मांगलेने कॉम्प्युटर डिप्लोमाकरिता प्रवेश घेतला. मात्र, तोही अर्धवट सोडून दिला. त्यानंतर, तो आपण प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा व्यवसाय करून अनेकांना फसवू लागला.