राबोडीच्या क्लस्टरसाठी कारागृह हलविण्याचा घाट, आमदार सरनाईकांनी केला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 02:03 PM2018-04-06T14:03:16+5:302018-04-06T14:03:16+5:30
ठाणे कारागृहाच्या मुद्यावरुन पुन्हा शिवसेनेतील दोन गट आमने सामने आले आहेत. कारागृह हलविण्यासाठी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रस्तावाची सुचना मांडली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षातील आमदार प्रताप सरनाईक यांनी हा प्रस्तावाच दफ्तरी दाखल करण्याची मागणी करुन म्हस्के यांनी पुन्हा आव्हान दिले आहे.
ठाणे - राबोडीमध्ये क्लस्टर योजना राबविण्यात ठाणे कारागृहाची अडचण होणार असल्यानेच ते या भागातून हलविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. कारागृह हलविण्यासाठी त्यांच्याच पक्षातील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी प्रस्तावाची सुचना मांडली होती. तसेच यासाठी अर्थसंकल्पात एक कोटींची तरतूदसुध्दा केली आहे. परंतु आता सरनाईकांनी ही प्रस्तावाची सुचना दफ्तरी दाखल करण्याची मागणी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.
ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर परिसरात हलविण्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्तावाची सूचना मांडण्यात आली असून यावर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी १ कोटीची तरतूद ठेवण्यात आली आहे. परंतु या प्रस्तावास या परिसराचे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोध दर्शविला असून ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर रोडवर हलविल्यास घोडबंदर परिसरातील विकास कामांना खीळ बसणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ठाणे कारागृहापासून जास्तीतजास्त १५०० मीटर व कमीतकमी ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकामांना परवानगी देता येत नाही आणि त्यामुळे राबोडी परिसराची क्लस्टर योजना जर बारगळत असेल तर त्यासाठी ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर परिसरात हलविण्याचा घाट घालणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सरनाईक यांनी अशा पध्दतीने आरोप केल्याने क्लस्टरसाठीच कारागृह हलविण्याचा घाट घातला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकीकडे घोडबंदर परिसरात मोठमोठे विकासप्रकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सहकार्याने साकार होत असताना जर ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर परिसरात हलविण्यात आले तर बांधकामाचा नियम घोडबंदर परिसराला लागू होणार असल्याने घोडबंदर परिसरातील विकासकामे थांबणार आहेत. त्यामुळे ज्या नगरसेवकांनी ही प्रस्तावाची सूचना मांडली त्यांनी आपल्या प्रभागातील मेंटल हॉस्पिटल च्या मोकळ्या जागेत अथवा इतर कोणत्याही ठिकाणी ठाणे मध्यवर्ती कारागृह स्थलांतरित करावे अशी सूचना सरनाईक यांनी केली आहे. प्रस्तावाची सूचना मांडणाऱ्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षातील आपल्या मित्रांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी घोडबंदर परिसराचा विकास खुंटवणे योग्य नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. एकूणच पुन्हा एकदा सरनाईक यांनी सभागृह नेते नरेश म्हस्के यांना टारगेट केल्याचे दिसून आले आहे. म्हस्के यांनीच प्रस्तावाची सुचना मांडली होती. परंतु आता त्यांच्याच पक्षातील आमदाराने अशा पध्दतीने त्यांच्यावर राष्ट्रवादीप्रती असलेल्या मैत्रीचा देखील खरपुस समाचार घेतला आहे. घोडबंदर परिसराच्या विकासाला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास घोडबंदरवासीय अशा लोकप्रतिनिधींना नक्कीच धडा शिकवतील असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आपल्या सवंग लोकप्रेयतेसाठी काही नगरसेवकांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह घोडबंदर परिसरात हलविण्याची मांडलेली प्रस्तावाची सूचना तसेच त्यासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली १ कोटीची तरतूद तातडीने रद्द करून हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करावा अशी मागणी त्यांनी महापौर व आयुक्त यांचेकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.
मी माझ्यासाठी ही प्रस्तावाची सुचना मांडलेली नाही. मी सभागृहात पक्षाची भुमिका स्पष्ट केली आहे. परंतु घोडंबदर भागातच कारागृह हलवावे असे कोणतेही मत आम्ही मांडलेले नाही. ज्याठिकाणी जागा असेल त्याठिकाणी ते हलविण्यात यावे अशी सुचना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(नरेश म्हस्के - सभागृह नेते, ठामपा)