...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 04:28 PM2024-05-10T16:28:06+5:302024-05-10T16:28:34+5:30

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Jitendra Awhad targets PM narendra Modi after statement on sharad pawar | ...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा

Jitendra Awhad ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "मला नरेंद्र मोदी यांचे दोन शब्द सर्वाधिक खटकले. ते म्हणाले की शरद पवार हताश आणि निराश झाले आहेत. ८४ वर्षांचा योद्धा हताश आणि निराश होऊ शकत नाही. आजही ज्या उत्साहाने ते अग्रेसर भूमिका घेऊन पुढे जात आहेत आणि  त्यांनी जे काही दौरे केले आहेत, त्यामध्ये शरद पवार हताश आहेत असं म्हणणे म्हणजे तुम्ही शरद पवार यांना ओळखलंच नाही," असं आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएसोबत येण्याचीही ऑफर दिली. मोदींच्या या ऑफरवर पलटवार करताना जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, "शरद पवार यांचे त्यांच्या विचारधारेवर प्रेम आहे. काँग्रेस ही एक गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे. ज्या विचारधारेसाठी त्यांनी स्वतःचं घर तुटताना पाहिलं, त्यांना यायचं असतं तर कधीच आले असते. त्यांना अजितदादांची काय गरज? ते थेट तुमच्याकडे आले असते," अशा शब्दांत आव्हाड यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

"नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणि पक्षा-पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी केलं आहे. तुम्ही तुमच्या जेष्ठ नेत्यांचा सन्मान कसा करतात हे संपूर्ण भारताने पाहिलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी देखील देशातील सर्वात ज्येष्ठ नेता असा उल्लेख शरद पवारांचा केला आहे. या पक्षाचे मालकच शरद पवार आहेत जो पक्ष यांनी चोरून आणि पळवून नेलेला आहे," असा हल्लाबोलही जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.

रवींद्र वायकरांच्या वक्तव्याचाही समाचार

माझ्याकडे तुरुंगात जाणे किंवा पक्षांतर करणे, असे दोनच पर्याय होते, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा उमेदवार रवींद्र वायकर यांनी केला आहे. यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, "रवींद्र वायकर यांनी केलेलं वक्तव्य अतिशय बोलकं आणि सर्वांना सावध करणारं आहे. मी रवींद्र वायकर यांचं अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्राला सत्य परिस्थिती सांगितली, जी इतर कोणी सांगितली नाही. सगळेजण पक्ष सोडून गेले ते याच कारणासाठी, पण रवींद्र वायकर यांनी सत्य सांगून टाकलं ," असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

Web Title: Jitendra Awhad targets PM narendra Modi after statement on sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.