पत्रकारांनी जांभेकरांसारखे सडेतोड लिखाण करावे - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 02:38 AM2018-01-07T02:38:21+5:302018-01-07T02:38:47+5:30
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भीडपणे लिखाण करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले.
डोंबिवली : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांसारखी सडेतोड पत्रकारिता नव्या पिढीतील पत्रकारांनी करावी, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी व्यक्त केली. समस्या सोडवण्यासाठी सतर्क, दक्ष पत्रकार असणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यांनी निर्भीडपणे लिखाण करणे आवश्यक आहे, असेही चव्हाण म्हणाले.
कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने बालभवन येथे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी राज्यमंत्री चव्हाण बोलत होते. महापौर राजेंद्र देवळेकर, सहायक पोलीस उपायुक्त दत्तात्रेय कांबळे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, न्यूज १८ ‘लोकमत’चे न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे, आयएमएचे सहसचिव डॉ. मंगेश पाटे, अण्णा बेटावदकर, पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय राऊत, डोंबिवली विभागीय अध्यक्ष अनिकेत घमंडी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार केतन बेटावदकर यांना झुंजार पत्रकार, ‘लोकमत’चे पत्रकार प्रशांत माने यांना कै. श्रीकांत टोळ स्मृती पुरस्कार, झी २४ तासचे प्रतिनिधी विशाल वैद्य यांना रत्नाकर चासकर पुरस्कार, डॉ. पाटे यांना पत्रकारमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राज्यमंत्री चव्हाण म्हणाले की, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर हे कोकणातले, मीही कोकणातला म्हणूनच सडेतोड आणि रोखठोक, स्पष्ट बोलणे हे आपल्याला अपेक्षित असते.
महापौर देवळेकर म्हणाले की, नव्या पत्रकार भवनाची वास्तू लागलीच कधी उभारली जाईल, ते सांगता येत नाही. पण, बालभवनची जागा पत्रकारांना त्यांच्या उपक्रमांसाठी विनामूल्य देण्यात येईल. आगामी काळात पत्रकार हल्लाविरोधी कायदा संमत झाला की, अनेक समस्या मार्गी लागतीलच, असा विश्वासही देवळेकर यांनी व्यक्त केला.
‘लोकमत’चे वरिष्ठ सहायक संपादक प्रधान म्हणाले की, नवोदित पत्रकारांच्या लेखनात अनेक चुका असतात. विषयाची माहिती नसल्याने लिखाणात स्पष्टता नसते. त्या सुधारण्याची नितांत गरज आहे. नव्या डिजिटल मीडियात वेळेची स्पर्धा जिंकतानाच चुकीची बातमी दिल्याने विश्वासार्हता गमावून बसणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. पत्रकार हुंजे म्हणाले की, पत्रकारांना अत्याधुनिकता आणि अचूकता दोन्ही साधणे गरजेचे आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाता कामा नयेत. डॉ. पाटे यांनी डॉक्टरांवरील हल्ले कायद्याने थांबले नाहीत, अशी खंत व्यक्त केली. पत्रकार संघाचे डोंबिवली अध्यक्ष अनिकेत घमंडी यांनी मान्यवरांचे स्वागत व आभारप्रदर्शन केले, तर पत्रकार निनाद करमरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
उपमहापौर मोरेश्वर भोईर, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, ज्येष्ठ नगरसेवक स्थायीचे सभापती रमेश म्हात्रे, केडीएमसीचे उपायुक्त सु.रा.पवार, राहुल दामले, संदीप पुराणिक, राजन आभाळे, विनोद काळण, निलेश म्हात्रे, विशू पेडणेकर, सरचिटणीस शशिकांत कांबळे, संजीव बीडवाडकर, नगरसेविका खुशबू चौधरी, डॉ. सुनीता पाटील, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी, डॉ. अर्चना पाटे, महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने, दत्ता माळेकर, रवी ठाकूर, नंदू परब आदी यावेळी उपस्थित होते.