महाराष्ट्र निवडणूक 2019: मनसेचं 'कल्याण'; शेवटच्या क्षणी 'इंजिन' धावलं, खातं उघडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 04:05 PM2019-10-24T16:05:46+5:302019-10-24T16:09:05+5:30
Kalyan Rural Vidhan Sabha Election Results 2019: मनसेला केवळ एका मतदारसंघात यश
कल्याण: सक्षम विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, असं आवाहन करणाऱ्या मनसेला केवळ एका जागेवर यश मिळालं आहे. कल्याण ग्रामीणमध्येमनसेच्याराजू पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेना आणि मनसेमध्ये चुरशीचा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर यामध्ये राजू पाटील यांनी बाजी मारली आणि मनसेला भोपळा फोडण्यात यश आलं.
सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती. शिवसेनेच्या रमेश म्हात्रेंनी त्यांना कडवी टक्कर दिली. अनेकदा राजू पाटील आणि रमेश म्हात्रे यांच्या मतांमध्ये अवघ्या काही शे मतांचा फरक दिसत होता. अखेर राजू पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पहिल्या विजयाची नोंद केली. मनसेला कल्याण ग्रामीणमध्ये यश मिळेल, अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती.
मनसेनं 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी मनसेला तब्बल 13 जागांवर यश मिळालं होतं. विशेष म्हणजे मुंबईत मनसेनं शिवसेनापेक्षा जास्त जिंकल्या होत्या. अनेक मतदारसंघात मनसेनं शिवसेना, भाजपाला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर मनसेची कामगिरी खालावली. 2014 मध्ये मोदी लाटेत मनसे सपाट झाली. त्यावेळी पक्षाचा केवळ एकमेव उमेदवार विजयी झाला. जुन्नरमध्ये शरद सोनावणे निवडून आले. मात्र त्यांनीही नंतर शिवबंधन बांधत पक्षाला सोडचिठ्ठी दिली.