कांदळवनांचा शोध अद्यापही नकाशावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 10:59 PM2018-10-28T22:59:31+5:302018-10-28T23:00:08+5:30
आधीच्या समित्या ठरल्या कुचकामी; न्यायालयीन बडग्यानंतर आली जाग
- सुरेश लोखंडे
ठाणे : एका बाजूने खाडीकिनारा आणि दुसऱ्या बाजूने डोंगरदºयांनी वेढलेल्या ठाणे जिल्ह्यातील खाडीकिनाºयाच्या कांदळवनांच्या सुरक्षा व संवर्धनाची सक्ती आता न्यायालयाने केली आहे. याआधीही न्यायालयाने कांदळवन, खारफुटी व तिवरांच्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपवली होती. त्यानंतर, जिल्हास्तरावर सनियंत्रण समित्या स्थापन झाल्या. पण, त्याही कुचकामी ठरल्या असून सध्या सॅकचे नकाशे मिळवून त्याद्वारे जिल्ह्यातील कांदळवनांच्या ठिकाणाचा शोध सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
त्सुनामीसारख्या जीवघेण्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याची क्षमता केवळ खारफुटीच्या कांदळवनांमध्ये आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने काही वर्षांपासून खाडीकिनाºयाच्या कांदळवनांचे संवर्धन व सुरक्षा करण्याची सक्ती केली. यामुळे सागरी जीवजंतूसुरक्षेसह पर्यावरणाचे संतुलन राखणे शक्य आहे. पण, त्यास फारसा प्रतिसाद न देता जिल्हा सनियंत्रण समित्या केवळ कागदावरच राहिल्या. मात्र, न्यायालयाने पुन्हा बडगा उगारल्यामुळे प्रशासनाची आता धावाधाव सुरू झाली. सात जिल्ह्यांतील कांदळवनसंरक्षण, संवर्धनासाठी आता कोकण विभागीय आयुक्तांची एकच सनियंत्रण समिती गठीत झाली. या माध्यमातून आता कांदळवनाच्या ठिकाणाचा नुकताच शोध सुरू केला. त्यासाठी सॅकचे नकाशे उपलब्ध करून ते एसएलआरकडे सोपवण्यात आल्याचे निदर्शनात आले.
कांदळवन, तिवरांचे व खारफुटींचे संवर्धन व सुरक्षा करण्यासाठी या ठिकाणाचा ताबा वनखात्याकडे कधीच देणे अपेक्षित होते. पण, जिल्हा प्रशासनाकडून या कारवाईलादेखील विलंब केला आहे. प्रशासनाकडे आतापर्यंत केवळ दोन हजार ६२.५६२ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनांची दस्तऐवजी नोंद आहे. यामध्ये ठाणे तालुक्यातील शासकीय जमिनीवर एक हजार ४७१.१४२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. तर, भिवंडी तालुक्यात शासकीय जमिनीवर ११३.३४०७ हेक्टर व अन्य जमिनीवर ४७८.०३ हेक्टर आदी मिळून ५९१.४२ हेक्टरवर कांदळवन असल्याची नोंद आहे. पण, यापेक्षा कितीतरी जास्त कांदळवनांचे क्षेत्र जिल्ह्यातील खाडीकिनारी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सॅकच्या नकाशांचे साहाय्य घेऊन शोध सुरू केला. उपलब्ध केलेल्या नकाशांद्वारे एसएलआर विभाग कांदळवनांच्या ठिकाणांसह त्यावरील क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी तत्कालीन नकाशांसह उपलब्ध गुगल नकाशांचा शोध घेऊन कांदळवनांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचा दुजोरा प्रशासनाद्वारे दिला आहे.
विकासकांनी भराव केलेल्या कांदळवनांची नोंद व्हावी
उपलब्ध नकाशांद्वारे मीरा-भार्इंदर, कोळशेत, नागलाबंदर, घोडबंदर, कल्याणची खाडी, कोपर, दिवा आदींसह नवी मुंबईच्या खाडी किनाºयाच्यादेखील कांदळवनांचा शोध सुरू आहे. पण, बहुतांशी ठिकाणची कांदळवने रेतीमाफियांनी नष्ट केली आहेत.
त्या ठिकाणी आता खाडीचे पाणी असून काही ठिकाणी गाळयुक्त क्षेत्र आहे. काही ठिकाणी सीआरझेडचे उल्लंघन करून विकासकांनी भराव टाकून कांदळवन दाबून टाकले आहे. ठिकठिकाणचे कांदळवन नष्ट करण्यासाठी त्यांच्या बुंध्याखाली केमिकल्स टाकून ती जाळली आहेत.
त्यांचे अवशेष आज खाडीमध्ये पाहायला मिळतात. काही ठिकाणी तर मोठमोठ्या तिवरांच्या झाडांची कत्तल करून उत्खननातील अडथळा दूर करण्याचे काम रेती माफियांनी केले. यामुळे बहुतांशी ठिकाणी ते दिसत नसले, तरी त्या भूखंडांची नोंद एसएलआर विभाग घेतो की नाही, याची चौकशी व्हावी.