ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांची अग्निशमन विभागाच्या नोटीसला केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:20 PM2018-01-02T16:20:43+5:302018-01-02T16:23:10+5:30
ठाणे - मुंबईत घडलेल्या घटनेनंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलामार्फत एनओसी नसलेल्या शहरातील सुमारे ४०० हॉटेल्स, पबला सहा महिन्यात पुन्हा दुसऱ्यांदा नोटीसा बजावल्या आहेत. आधी देखील एकाही हॉटेल्स अथवा पबवाल्यांनी कागदपत्रांची पुर्तता केली नव्हती. आता देखील तिच परिस्थिती असून एकाही हॉटेलवाल्याने कागदपत्रांची पुर्तता केली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु आता पालिका अशा हॉटेलवाल्यांच्या विरोधात कारवाईचे हत्यार उगारणार की आपली तलवार म्यान करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठाणे शहरातील ज्या हॉटेल व्यावसायिंकाकडे फायरची एनओसी नसेल त्या सर्व व्यावसायिकांना महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक कायदा, २००६ तसेच महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ मधील तरतूदीनुसार ७१ तासांच्या अवधीची नोटीस बजावली गेली आहे. परंतु ७२ तास उलटून गेल्यानंतरही अग्निशमन दलामार्फत नोटीसा बजावण्याचे काम सुरु आहे. बुधवार पर्यंत नोटीसा बजावल्या जाणार असून त्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरविली जाईल, असे अग्निशमन दलाने स्पष्ट केले आहे. मुबंईत कमला मिल येथे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने अग्नी सुरक्षा यंत्रणांची पूर्तता न करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांच्या बाबतीत कडक भूमिका अवलंबली आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत एनओसी नसलेल्या हॉटेल, पब आणि तळघरातील हॉटेलचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर अग्निशमन विभागाने अशा हॉटेलवाल्यांना नोटीसा बजावल्या होत्या. परंतु तेव्हा या सर्वांकडून शुन्य प्रतिसाद मिळाला होता. आता पुन्हा मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागामार्फत नोटीसा बजावण्याचे काम सुरु झाले आहे. मुंबईत घडलेल्या घटनेनंतर आता ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत हॉटेलांना कागदपत्रे सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली असून आजही ती कारवाई सुरुच आहे. मात्र महापालिकेच्या या आदेशाला हॉटेल मालकांनी गांभीर्याने घेतले नसून दोन दिवस उलटूनही एकाही हॉटेल वाल्याने कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही.
या संदर्भात अग्निशमन विभागाचे प्रमुख शशीकांत काळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की अद्यापही नोटीस बजावण्याची कारवाई सुरु आहे. बुधवार पर्यंत हॉटेलवाल्यांना वेळ देण्यात आला आहे. परंतु त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.
मुंबईतील कमला मिल मध्ये घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने ठाण्यातील एनओसी नसलेल्या सुमारे ४०० हॉटेल्स आणि पबवाल्यांना कागदपत्रे सादर करण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. परंतु अद्यापही एकानेही त्याला प्रतिसाद दिलेला नाही.