कातकरी उत्थान अभियानास गालबोट ; मुरबाड तालुक्यातील कातकरी कुटुंबाचे घरे तोडूनही पोलिसांसह प्रशासन बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 07:43 PM2018-04-21T19:43:42+5:302018-04-21T19:43:42+5:30
इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार
ठाणे : देशभर ज्या दिवशी सर्वजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असतानाच मुरबाड तालुक्यातील इंदे गावामधील एका आदिवासी - कातकरी वृध्द कुटुंबाचे राहते घर तोडून त्यास बेघर केले.
त्यांची दखल महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांनी देखील घेतली नाही, यामुळे कातकरी उत्थान अभियानास गालबोट लागून अधिका-यांची निष्काळजी उघड झाली.
आदिवासी - कातकरी समाजाच्या सर्वांगिण विकासा करीता कातकरी उत्थान अभियान राबवले जात आहे. केवळ कागदावर रंगवण्यात येत असलेल्या या अभियानाचा अद्यापही भरीव लाभ कातकरी कुटुंबियाना झालेला नसल्याचे सांगितले जात आहे. त्यात इंदे येथील वृध्द कुटुंबाचे राहते घर बिगर आदिवासी जमीन मालकाने तोडून या परिवारावर अन्याय केल्याचा आरोप करून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी श्रमीक मुक्ती संघटनेच्या वरिष्ठ नेत्या अॅड. इंडवी तुळपुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याशिवाय ठाणे जिल्हाधिका-यांसह विभागीय आयुक्तांच्या निदर्शनात ही दुर्दैवी घटना आणल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात इंदे गावातील एका वृद्ध कातकारी जोडप्याचे झोपडे १४ एप्रिल रोजी दुपारी तोडले. त्यांना बेघर केले गेले. त्याच दिवशी संध्याकाळी स्थानिक टोकावडे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार घेऊन गेलेल्या कातकरी वृद्धेला चौकशी करू, असे फक्त आश्वासन देऊन त्याच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप मुख्यमंत्र्याना दिलेले पत्रात करण्यात आला. गेल्या वर्षी कातक-यांच्या घरठान विषयी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून त्यांच्या घरांच्या नोंदींचे आदेश सर्व जिल्ह्यातील महसूल अधिका-यांना दिले आहे.
या जोडप्याच्या झोपडीची नोंद शासन दरबारी आहे. असे असतानाही बिगर आदिवासी जमीन मालकाने या आदिवासिना हाकलून लावण्यासाठी त्यांचे घरच तोडून त्यांना बेघर केले आहे. पोलिसांनी देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी गुरूवारी १९ एप्रिल रोाजी स्थानिक श्रमिक मुक्ति संघटनेतर्फे तहसीलदाराना पत्र दिले व करवाईची मागणी केली. नुकताच महसूल विभागाने आता पंचनामा केल्याचे तुळपुळे यांनी सांगितले. जीव घेण्या उष्णतेच्या लाटेत हे जोडपे उघड्यावर पडले आहे. कोंकण विभागात गाजावाजाने सुरु असलेल्या कातकरी उत्थान अभियानाच्या कार्यक्रमास या दुर्दैवी घटनेमुळे गालबोट लागले आहे. तातडीने व गंभीरतापूर्वक लक्ष घालून कठोर करवाई तसेच या कुटुंबाच्या निवार्याची सोया करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
..........