कोकण पदवीधर निवडणूक : भाजपा-शिवसेना पुन्हा खडाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 06:47 AM2018-06-02T06:47:43+5:302018-06-02T06:47:43+5:30

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धूळ चारुन त्या पक्षाचे नाक कापण्यात

Konkan graduate election: BJP-Shiv Sena re-elected Khamakhadi | कोकण पदवीधर निवडणूक : भाजपा-शिवसेना पुन्हा खडाखडी

कोकण पदवीधर निवडणूक : भाजपा-शिवसेना पुन्हा खडाखडी

googlenewsNext

ठाणे : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला धूळ चारुन त्या पक्षाचे नाक कापण्यात अपयश आल्याने चडफड सुरु असलेल्या शिवसेनेनी विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर प्रमाणेच कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक शिवसेनेनी यापूर्वी लढवलेली नाही.
येत्या २५ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीच्या तोंडावर निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये उडी घेतली. मागीलवेळी शिवसेनेनी डावखरे यांना आतून मदत केल्याने भाजपाचा परंपरात मतदारसंघात पराभव झाला होता. आता पालघरच्या पराभवाने डिवचली गेलेली शिवसेना थेट आव्हान देण्याच्या पवित्र्यात आहे. त्यामुळे मागीलवेळी डावखरे यांना साथ देणाºया शिवसेनेसोबत त्यांना दोन हात करावे लागणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर केलेला नसून पुढील आठवड्यात ६ जूनपर्यंत जाहीर केला जाणार आहे. मात्र नगरसेवक नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे कोकण पदवीधरची निवडणूक तिरंगी होणार हे स्पष्ट दिसत आहे. परिणामी या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपामध्ये ‘कांटें की टक्कर’ होणे अपेक्षित आहे.
मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी भाजपाचे संजय केळकर यांचा पराभव केला होता. त्यावेळेस डावखरे यांना २७ हजार, केळकर यांना २२ हजार मते पडली होती. डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला असल्याने साहजिकच पुन्हा मुख्यमंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
वसंत डावखरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जिव्हाळ््याचे संबंध होते. मात्र बाळासाहेबांच्या पश्चात झालेल्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रवींद्र फाटक यांना उमेदवारी देऊन वसंत डावखरे यांना पराभूत केले होते. आता त्यांचे पुत्र निरंजन यांच्या विरोधातही शिवसेनेनी षड्डू ठोकला आहे.
पालघरच्या निवडणुकीमुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंधांमध्ये काहीसा दुरावा निर्माण झाला असताना आता कोकण पदवीधरमध्ये पुन्हा खडाखडी होणे अपरिहार्य आहे. शिवसेनेची ठाण्यात ताकद आहे.
नजीब मुल्ला यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर गणेश नाईक नवी मुंबईत त्यांच्या पाठीशी किती बळ उभे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांना अलीकडे निवडणुकीत भाजपाची साथ लाभली. नारायण राणे हेही तटकरे यांच्या मदतीला धावले. त्यामुळे तटकरे
त्याची परतफेड करणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देणार हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवसेना व भाजपा यांच्यापैकी कोकणातील पदवीधरांचा अधिक पाठिंबा कोण मिळवतो, याचेही कुतूहल आहे.
भाजपाने निरंजन यांना उमेदवारी दिल्याने भाजपातील ठाणे व रत्नागिरी येथील काही निष्ठावान मंडळी नाराज असल्याची चर्चा आहे.

Web Title: Konkan graduate election: BJP-Shiv Sena re-elected Khamakhadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.