ठाण्यात मतदार यादीतून नावं गायब; अनेक मतदार मतदानापासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 01:55 PM2019-04-29T13:55:22+5:302019-04-29T14:22:41+5:30
ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
ठाणे - ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लीप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला आहे.
चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (58) आणि नानजी छाडवा (63) या दाम्पत्याला मात्र मतदान यादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही. चरईतील दगडी शाळेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. त्यांच्याकडे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रंही होती. गेल्या 30 वर्षापासूनचे छाडवा कुटूंब चरईत वास्तव्यास आहे. गेल्या 2014 च्या निवडणूकीत मतदान केलेलं असताना यावेळी मात्र मतदार यादीतील नावच गायब झाल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते. मतदार चिठ्ठी घेऊनही त्यांच्याकडे निवडणूक कार्यालयातील कोणी फिरकले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Lok Sabha Election Voting Live: महाराष्ट्र पिछाडीवर; सकाळी 12 पर्यंत केवळ 17.21% मतदान https://t.co/NjrrMEsSS5#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2019
अशोक जैन (48) हे चरईतील कृष्णा हेरिटेज इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांनी संतोषीदेवी (46) तसेच चिराग (26) आणि सुमित (24) या दोन मुलांचाही पत्ता बदलल्याचे पत्र मे 2018 मध्येच दिले. मात्र आठ ए च्या फार्म ची प्रक्रिया बाकी असल्याचं त्यांना एप्रिल 2019 मध्ये सांगण्यात आले. विशेष म्हणजे पत्नी आणि मुलांची नावे मतदार यादीत आली. पण अशोक यांचे स्वत:चे नाव मात्र यादीत आलेच नसल्यामुळे त्यांनीही निवडणूक आयोगाच्या या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील 17 मतदारसंघांतील मतदानासाठी आतापर्यंत मतदारांनी काहीसा निरुत्साह दाखवला आहे. महाराष्ट्रात दुपारी 12 वाजेपर्यंत 17.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मुंबईतल्याईशान्य मतदारसंघासह सहा लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान पार पडत आहे. निवडणुकीत मुंबईतून 116 उमेदवार नशीब आजमावत आहेत. मुंबईतल्या सहाही जागांवर महायुती आणि आघाडीत थेट लढत असली, तरी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेमुळे निवडणुकीत रंगत आली आहे. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत मुंबईने एकतर्फी कौल दिला होता. 2014साली सर्व जागा युतीकडे तर त्या आधी 2009 साली सहाही जागा आघाडीकडे होत्या. एकाच पारड्यात दान टाकण्याची प्रथा यंदा कायम राहणार की बदलणार, याबाबत उत्सुकता आहे.
Lok Sabha Election Voting Live: दुपारी 12 पर्यंत 24% मतदान; पश्चिम बंगाल आघाडीवर https://t.co/NjrrMEsSS5#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2019