महेश पाटील एसीबीत, शिवाजी राठोड अधीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 03:26 AM2018-07-29T03:26:25+5:302018-07-29T03:26:37+5:30
ठाणे पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा सध्या जोर धरत असतानात येथील काही उपायुक्तांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. यात काहींना पदोन्नतीदेखील मिळाली आहे. परंतु, या बदल्यानंतर पोलीस आयुक्तालयात अनेक महत्त्वाचे फेरबदलही झाले आहेत.
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा सध्या जोर धरत असतानात येथील काही उपायुक्तांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. यात काहींना पदोन्नतीदेखील मिळाली आहे. परंतु, या बदल्यानंतर पोलीस आयुक्तालयात अनेक महत्त्वाचे फेरबदलही झाले आहेत. आयुक्तालयातील एकूण सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून त्यामध्ये अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मकरंद रानडे यांची पदोन्नतीने नवीन झालेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर, ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशनानंतर या बदल्या होतील, अशीही चर्चा होती. मात्र, शुक्र वारी गृहविभागाने ठाणे पोलीस आयुक्तालयासह राज्यातील आयपीएस अधिकाºयांसह इतरही अधिकाºयांच्या बदल्या केल्या. ठाणे आयुक्तालयातील झोन-२चे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांना सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी धाडले आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची मुंबईत, तर झोन-५ चे उपायुक्त सुनील लोखंडे यांची नवी मुंबईत बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधीक्षकपदी पाठवले आहे. विशेष शाखेचे उपायुक्त सुनील भारद्वाज यांची अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्ती झाली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संग्रामसिंह निशाणदार यांची मुंबईत बदली झाली असून त्यांच्या जागी ठाणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना आणले आहे.
ठाणे आयुक्तालयातही काही नवे अधिकारी बदली होऊन आले आहेत. यात एस.एस. बुरसे (पोलीस उपायुक्त, मुंबई), दीपक देवराज (पोलीस उपायुक्त, मुंबई), अविनाश अंबुरे (सहायक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था), पी.पी. शेवाळे (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग), संजय जाधव (समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, नवी मुंबई) यांचा समावेश आहे. तर, पदोन्नती देऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपमहानिरीक्षक के.जी. पाटील ठाण्याच्या अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) पदी आले आहेत.
- नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील उपायुक्त प्रवीण पवार यांची अपर आयुक्त (गुन्हे, ठाणे) या पदी नियुक्ती केली. नव्याने ठाणे पोलीस येथे दाखल झालेले अधिकारी गुन्हेगारी रोखण्यासाठी कसा प्रयत्न करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय, लातूरचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांची ठाणे ग्रामीण अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.