साहित्याची मेजवानी देणारा अत्रे कट्टा बदलणार
By admin | Published: May 26, 2017 12:06 AM2017-05-26T00:06:50+5:302017-05-26T00:06:50+5:30
जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी येथे १६ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या आचार्य अत्रे कट्ट्याचे स्वरुप आता लवकरच बदलणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी येथे १६ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या आचार्य अत्रे कट्ट्याचे स्वरुप आता लवकरच बदलणार आहे. एखाद्या महिन्यात पाचवा बुधवार आल्यास त्या दिवशी प्रेक्षकांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. तरुण प्रेक्षकांनी या कट्ट्यावर अधिकाधिक हजेरी लावावी, यासाठी कट्ट्याला वेगळे रुप देणार असल्याचे कट्ट्याच्या समितीने सांगितले.
आठवड्यातील दर बुधवारी ठाणेकरांना साहित्याची मेजवानी देण्याचे काम कट्टा करीत आहे. आतापर्यंत कट्ट्यावर महिन्यातील चार बुधवारी फक्त कार्यक्रमच होत असे. विविध विषयांवर आमंत्रित मान्यवरांचे या ठिकाणी कार्यक्रम सादर होत. गेल्या १६ वर्षांत आठशेहून अधिक कार्यक्रम कट्ट्यावर झाले. २००१ मध्ये संपदा वागळे आणि विदुला ठुसे यांनी या कट्ट्याची स्थापना केली आणि पाहता पाहता या कट्ट्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला.
आता येथे वाचन कट्टा सारखा अभिनव उपक्रमाची सुरूवात होणार आहे. यात अभिवाचन, एखादा मान्यवर किंवा स्थानिक हे त्यांनी वाचलेल्या गोष्टींवर किंवा काय चांगले वाचले, काय वाचावे हे लोकांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. महिन्यातील दोन बुधवार कार्यक्रम तर एक बुधवार वाचन कट्टा असेल. दुसऱ्या बुधवारी सभासदांची बैठक घेण्यात येईल.
केवळ कार्यक्रमापुरतेच येथील सभासद एकत्र येत. त्यामुळे कार्यक्रमांची आखणी, विविध विषयांचे नियोजन यासाठी पुरेसा वेळ देणे शक्य नसे. आता महिन्यातील एक बुधवार बैठकीसाठी ठरविल्यामुळे कट्ट्यासंदर्भात निर्णय किंवा कट्ट्यावर पुढे आणखीन काय नावीन्यपूर्ण करता येईल, याबाबत चर्चा केली जाईल, नवनिर्वाचित अध्यक्षा शीला वागळे यांनी सांगितले.
महिन्यात एखादा पाचवा बुधवार असेल तो दिवस प्रेक्षकांसाठी राखीव असेल. त्यादिवशी कट्ट्यावर प्रेक्षकांना व्यक्त होण्याची तसेच, आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. चार बुधवारपैकी पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी कार्यक्रम होतील.