आम्ही आंबा 'चोपून' खाल्ला; ठाण्यातील राड्यावरून राज ठाकरेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 03:42 PM2019-05-13T15:42:53+5:302019-05-13T15:43:52+5:30
गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे.
ठाणे - गेल्या काही दिवसांपासून ठाण्यात आंबा स्टॉलवरुन झालेल्या राड्याचा राज्यभरात चांगलाच गाजावाजा झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या राड्यावर भाष्य करत भाजपाला टोला लगावला आहे. कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार यांनी पंतप्रधानांना एक प्रश्न विचारला होता. आंबा कापून खायचा की चोखून खायचा? यावर आमच्या लोकांनी तो चोपून खाल्ला असा चिमटा भाजपाला काढला आहे. ठाण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेती उत्पादन राज्य सरकारने शहरात स्टॉल स्थापन करून विकण्याची परवानगी दिली आहे. भाजीपाला विकू शकतात मग आंब्यानं काय घोडं मारलं होतं? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जर शेतकऱ्यांना चार पैसे मिळत असतील तर त्यांना विकू देत नाही. भाजीपाला विकू देत,भलं शेतकऱ्यांचं होतंय, मग यात पक्षीय राजकारण कसलं आणताय असंही राज यांनी सांगितले.
ठाण्यात आंब्याच्या स्टॉलवरुन मनसे - भाजप वाद सुरूच
आंब्याचा स्टॉल हटवण्याच्या मुद्द्यावरुन सोशल मिडीयावर मनसे-भाजप कार्यकर्त्यांची एकमेकांवर जोरदार चिखलफेक सुरू आहे. एका मराठी शेतकऱ्याला विरोध करणारा भाजप हा त्याच ठिकाणी फुटपाथवर असलेल्या परप्रांतीय आंबे विक्रेत्याला विरोध का करीत नाही, असा सवाल मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी रविवारी फेसबुकवर लाईव्ह करत विचारला होता.
ठाण्यात आंबा स्टॉलवर कारवाई करावी यासाठी भाजपाच्या नगरसेवकाकडून महापालिकेत तक्रार करण्यात आली. त्यानंतर हा स्टॉल हटविण्याला मनसेने विरोध केला. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद शमला नाही शेवटी या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं अखेर पोलिसांना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. दरम्यान मनसेने आंबा स्टॉल हटविण्याचा विरोध करत शेतकऱ्यांसाठी १७ मे रोजी मोर्चा काढण्याचे मनसेने जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेने आयोजित केलेल्या शेतकरी मोर्चामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण आणखी तापू लागणार हे नक्की