महापौर आमचाच होणार!, भाजपाचे शिवसेनेला प्रत्युत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:54 AM2018-05-03T01:54:42+5:302018-05-03T01:54:42+5:30
कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाची निवडणूक ९ मे रोजी होत आहे.
कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदाची निवडणूक ९ मे रोजी होत आहे. उल्हासनगरमधील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर कल्याणचे महापौरपद शिवसेना आपल्याकडेच ठेवेल, असे संकेत मिळत असताना दुसरीकडे भाजपाने महापौर आमचाच, असे प्रत्युत्तर शिवसेनेला दिले आहे. बुधवारी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आगामी महापौर आमचाच होईल, असे परिपत्रक भाजपाने जारी केले आहे. दरम्यान, आमचे संख्याबळ अधिक असल्याने आमचाच महापौर होईल, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
केडीएमसीत शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९, असे पक्षीय बलाबल आहे. महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या शिवसेना-भाजपाने मात्र संख्याबळाच्या आधारावर सत्ता स्थापन केली. सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे महापौरपदाचा मान मिळाला, तर उर्वरित अडीच वर्षांमध्ये भाजपाला एक वर्ष आणि दीड वर्षे शिवसेनेला, असा फॉर्म्युला युतीचा ठरला आहे. परंतु, उल्हासनगरमधील सत्तांतराच्या वातावरणात शिवसेनेला कल्याणचे महापौरपद पुन्हा राखण्याची संधी चालून आल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने शिवसेनेकडून संभाव्य उमेदवारांची नावेही चर्चिली जात आहेत.
दरम्यान, भाजपाच्या कल्याण जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली.
यावेळी खासदार कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार रमेश पाटील, उपमहापौर मोरेश्वर भोईर, स्थायी समिती सभापती राहुल दामले, जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, शिवाजी आव्हाड, नंदू जोशी, गटनेते वरुण पाटील, अनिरुद्ध जाधव, महिला मोर्चा अध्यक्षा उज्ज्वला दुसाने व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आगामी महापौर भाजपाचाच होणार, असा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा सरचिटणीस कांबळे यांनी दिली.
महापौर शिवसेनेचाच
वरिष्ठांची बोलणी झालेली आहेत. त्याप्रमाणे महापौर ठरेल. शिवसेनेचे जास्त नगरसेवक असल्याने शिवसेनेचाच महापौर होणार. शिवसेनेमध्ये सर्व आदेशाप्रमाणे चालते. त्याप्रमाणे कृती होईल, असे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.