कोणाचीही तमा न बाळगता अनाधिकृत होर्डींग्जवर कारवाई करण्याचे महापौर मीनाक्षी शिंदे यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:34 PM2018-12-21T12:34:11+5:302018-12-21T12:35:46+5:30
ठाणे शहरातील अनाधिकृत होर्डींग्जचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शहरात अनाधिकृत होर्डींग्जच नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु या अनाधिकृत होर्डींग्जचा शोध घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत.
ठाणे - ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत होर्डींग्जचा आकडा पालिकेच्या दप्तरी असला तरीसुध्दा अनाधिकृत होर्डींग्ज कीती याची माहिती मात्र प्रशासनाला पुन्हा एकदा देता आलेली नसल्याची बाब गुरुवारी झालेल्या महासभेत उघड झाली आहे. परंतु या अनाधिकृत होर्डींग्जमुळे महापालिका प्रशासनाचा महसुल बुडत असून येत्या दोन दिवसात शहरात कुठे आणि कशा पध्दतीने अनाधिकृत होर्डींग्ज लागले आहेत, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच या होर्डींग्जवर तत्काळ कारवाई करा, असे सांगतांनाच कोणत्याही नेत्याचे होर्डींग्ज असेल तरी कोणाचाही तमा न बाळगता त्यांच्यावरही कारवाई करा अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.
गुरुवारच्या महासभेत प्रश्नाउत्तरांच्या तासांच्यावेळी भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत होर्र्डींग्ज बाबत प्रशासनाला सवाल उपस्थित केला. शहरात अधिकृत होर्डींग्ज ५९६ असले तरी अनाधिकृत होर्डींग्ज कीती याची माहिती मात्र प्रशासनाला देता आली नाही. त्यामुळे शहरात कुठेच अनाधिकृत होर्डींग्ज नाहीत का? असा सवाल सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला. त्यातही जे अधिकृत होर्डींग्ज लावण्यात आले आहेत, त्या ठिकाणीसुध्दा परवानगी २० बाय २० ची असेल तर ३० बाय ४० फुटांचे होर्डींग्ज लावले जात आहे. शहरातील नौपाडा, हरिनिवास, घोडबंदर अशा अनेक ठिकाणी असे होर्डींग्ज लागले असल्याचा मुद्दा सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. तर या सर्वांवर सरसकट कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी केली. भविष्यात ठाण्यात पूण्यासारखी घटना घडल्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडणार आहेत का? असा सवालही सदस्यांनी उपस्थित केला. त्यातही कळवा खाडीतील होर्डींग्जवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा सवाल पेंडसे यांनी उपस्थित केला. परंतु या संदर्भात न्यायलयीन प्रक्रिया सुरु असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.
दरम्यान अनाधिकृत होर्डींग्ज बाबत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली. कापुरबावडी जंक्शनवर मोडकळीस आलेल्या इमारतीच्या आड भले मोठे होर्डींग्ज लागले आहे. शहरातील इतर भागातही अशीच परिस्थिती असल्याने या अनाधिकृत होर्डींग्ज अहवाल येत्या दोन दिवसात सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच होर्डींग्ज कोणाचेही असेल तरी कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता त्या सर्व होर्डींग्जवर कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.