नाशिकमधील दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 07:52 PM2018-02-21T19:52:50+5:302018-02-21T19:58:28+5:30
सहप्रवासींना धक्काबुक्की करत, हातचलाखीने पर्समधील सोन्याचे दागिने लांबवणा-यांना अटक केली. त्यांना संशयीत म्हणून ताब्यात घेतल्यानंतरही दोन गुन्हे उघडकीस आले. ही चोरी करताना, चोरट्या महिला लहान मुलाला हाती घेऊन चोरी करत होत्या.
ठाणे : संशयीत म्हणून ताब्यात घेतलेल्या नाशिकमधील दोन महिलांसह एका अल्पवयीन मुलाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात मंगळवारी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांनी ठाण्यातील दोन गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या अंगझडतीत सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्या दोघींना कल्याण रेल्वे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच त्या दोघींविरोधात पेण रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील रेल्वे प्रवासादरम्यान पर्समधून दागिने चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या.याचदरम्यान, तक्रारदारांनी केलेल्या वर्णनानुसार,ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिसांच्या निर्भया पथकामार्फत शोध सुरू असताना,मंगळवारी या पथकाने ठाणे एसटी स्थानकाच्या जवळ संशयित्या फिरताना वैशाली विजय साळुंखे (३५ ),चांगुणा विक्र ांत भोसले (२२) आणि एक १३ वर्षीय अलपयीन मुलगा अशा तिघांना (राहणार,भीमनगर ,पंचवटी, नाशिक) ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी ठाण्यातील दोन गुन्ह्याची कबुली दिली.तसेच त्यांच्या अंगझडतीत,५४ हजारांचे एक नेकलेस, १४ हजारांची कानातील दोन कर्णफुले,सहा हजारांची दोन बुट्टी जोडी,१५ हजारांची एक अंगठी , १५ हजारांची एक लेडीज अंगठी,दीड लाखांचे एक सोन्याचे मंगळसुत्र, २७ हजारांची रोकड असे एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्या दोघींना बुधवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली. अटकेतील त्या दोघींपैकी एकीला नव-याने सोडले आहे. तसेच दुसरीचा नवरा दारूड्या असून त्या दोघी पारधी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
* अशी करत चोरी
या दोघी काही दिवसांपूर्वी नाशिकमधून कल्याणला आल्या होत्या.त्यानंतर त्यांनी कल्याण ते सीएसटी असा रेल्वेने प्रवास केला आहे.याचदरम्यान, त्या दोघी सहप्रवासींना धक्काबुक्की करून पर्सची चेन उघडून सोन्याचे दागिने लांबवत अशी त्या दोघींची चोरी करण्याची पद्धत होती अशी माहिती पोलिसांनी दिली.
* पेणमध्ये १० तोळे लांबवले
या दोघींनी पेणमध्ये रेल्वे प्रवासात १० तोळे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. त्यांचा तो प्रकार सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाला आहे. त्यामुळे लवकर पेण पोलीस त्यांचा ताबा घेतली. तसेच इतर स्थानकात अशाप्रकारे गुन्हे घडले आहेत का याची माहिती घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.