ठाण्यात मनसेचा राडा, परप्रांतीय मासे विक्रेत्यांना केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 03:11 PM2017-11-24T15:11:04+5:302017-11-24T15:38:19+5:30
गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा दादागिरी बघायला मिळाली आहे.
ठाणे - गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा एकदा दादागिरी बघायला मिळाली आहे. स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त केल्यानंतर आता ठाणे शहर मनसेने शहरातील परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील विविध भागात मासे विक्रीचा व्यवसाय करणा-या परप्रांतियांना मनसे स्टाईलने बेदम चोप दिला.
मासे विक्री करणाऱ्या आगरी कोळी बांधवांना परप्रांतिय मासे विक्री करणाऱ्यामुळे त्रास होत असल्याची आणि त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार मनसेकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार शुक्रवारी शहराच्या विविध भागात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून परप्रांतिय मासे विक्री करणा-यांना मनसे स्टाईलने चोप देण्यात आला. कोलबाड भागातील आगरी कोळी समाजातील मासे विक्रेत्यांना या परप्रांतिय मासे विक्री करणा-यांचा त्रास होत होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली असून या मासे विक्री करणाऱ्याना येथून पिटाळू लावण्यात आले आहे.
कोलबाड परिसरातील रस्त्यांवर अनेक मच्छी विक्रेते बसतात. एक रांगेत जवळपास 20 ते 25 मच्छी विक्रेते बसतात. यातील बहुतेक मच्छी विक्रेते हे परप्रांतीय आहेत, असा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे. ठाणे आणि कोलबाड परिसरातील स्थानिक कोळी समाज आहे, त्यांना या ठिकाणी मच्छी विकण्यास बसण्यासाठी जागा द्यावी, अशी मागणी मनसेची आहे.
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर, रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी आपल्या स्टाइलनं आंदोलन केलं. रेल्वे स्टेशनांच्या आसपास 150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना बसता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिल्यामुळे मनसेला नवं बळच मिळालं आहे.