मनसेने लावले डोंबिवलीत होर्डिंग्ज: भ्रष्टाचारी संजय घरतला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 03:33 PM2018-06-16T15:33:30+5:302018-06-16T15:34:43+5:30
अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाचप्रकरणी एसीबीने गजाआड केल्यानंतर विविध स्तरावर लाचखोरीच्या चर्चा सुरु आहेत. त्यात मनसेने शुक्रवारी रात्री शहरात होर्डिंग्ज लावले असून त्यात भ्रष्टाचारी संजय घरतला बेड्या, अखेर सत्याचा विजय असा आशय नमूद केला आहे.
डोंबिवली: अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना ८ लाखांची लाचप्रकरणी एसीबीने गजाआड केल्यानंतर विविध स्तरावर लाचखोरीच्या चर्चा सुरु आहेत. त्यात मनसेने शुक्रवारी रात्री शहरात होर्डिंग्ज लावले असून त्यात भ्रष्टाचारी संजय घरतला बेड्या, अखेर सत्याचा विजय असा आशय नमूद केला आहे.
शहरातील इंदिरा गांधी चौकासह अन्यत्र पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी हे होर्डिंग्ज लावले असून ते म्हणाले की, पक्षाचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आधीच घरत हे भ्रष्टाचारी असल्याचे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते. ते आता केवळ सिद्ध झाले असून मनसे मतांसाठी नव्हे तर लोकांच्या मनातील काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सभागृहादेखिल मनसेमुळे घरत यांच्यावर निलंबनाचा ठराव संमत झाला होता. तसेच घरत यांचे पद हे राज्य शासनाचे नसून ते महापालिका नियुक्त अधिकारी असल्याचे लेखी पत्र शासनाकडून मनसेनेच आणले होते. त्यावरून मनसेने जे म्हंटले होते ते सिद्ध झाले.
निदान आता तरी आगामी काळात घरत यांना केडीएमसीने पुन्हा सेवेत घेऊ नये, जर तसा विषय कधी पटलावर आला तर मनसे त्यावेळी सभागृहामध्ये भूमिका स्पष्ट करेलच असेही ते म्हणाले. लाचखोर घरत यांच्या जागी शासनाने त्वरीत अतिरिक्त आयुक्त पाठवावा. जेणेकरून इथल्या नागरिकांची कामे थांबणार नाहीत. विकास कामांना अधिक गती मिळेल. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी कामे रेंगाळली होती, त्या कामांचा मार्ग सुकर व्हावा. व्यक्तिगत हेवेदाव्यांमुळे शहरांचा विकास थंडावला होता, पण आता भ्रष्टाचाराचे जेथे मुळ होते त्यानाच अटक झाल्याने यापुढे गैरव्यवहार होणार नाहीत अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात मंदार हळबे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी बाहेरगावी असून पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांच्याशी संपर्क साधावा.