महिला पोलिसांचा विनयभंग: ठाण्याचे राखीव निरीक्षक शिंदे यांना अटक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 08:15 PM2018-02-04T20:15:54+5:302018-02-04T20:19:17+5:30
ठाणे मुख्यालयाचे निलंबित राखीव पोलीस निरीक्षक यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला जाण्यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात प्रयत्न करावेत, अशी मागणी शिवसेना उपनेत्या नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
ठाणे: दोन महिला पोलिसांचा विनयभंग प्रकरणात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळालेल्या ठाणे मुख्यालयाचे राखीव पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेना उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या प्रतोद नीलम गो-हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. वरिष्ठ महिला आयपीएस अधिका-याच्या समितीमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात गो-हे यांनी म्हटले आहे की, महिला पोलिसांच्या विनयभंग प्रकरणात शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी देखील शिंदे यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. हा जामीन अर्ज फेटाळण्यासंदर्भात शासनाने न्यायालयाकडे सरकारी वकीलामार्फत मागणी करावी. शिंदे यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळण्यासंदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून कोणतीच कारवाई न होता, वेळ काढूपणा केला जात असल्याची शंका असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
तक्र ारदार महिला पोलीस कर्मचा-यांचे समुपदेशन करण्यात यावे तसेच या महिलांची तात्पुरती दुसºया विभागात बदली केली असली तरी शिंदे यांना अटक न झाल्यामुळे मुख्यालयातील महिलांमध्ये घबराट आणि अस्वस्थता आहे. त्यामुळे ताबडतोब अटकेची कारवाई करावी.
या प्रकरणात आणखीन कोणत्या अधिका-यांचा समावेश आहे का? याचीही सखोल चौकशी होण्यासाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांची चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जावी, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.