खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 12:12 PM2018-07-10T12:12:25+5:302018-07-10T12:17:16+5:30

तरुणानं चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे.

Mumbai rains: Man ready to pay for security on pothole-ridden Kalyan-Dombivali stretch | खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण ! 

खड्ड्यांपासून जिवाला धोका; त्याला हवंय पोलीस संरक्षण ! 

googlenewsNext

कल्याण - एखाद्या व्यक्तीपासून जिवाला धोका निर्माण झाल्यास पोलीस संरक्षण पुरवण्याची  मागणी केल्याचे आपण ऐकलं असेलच. मात्र कल्याणमधील एका तरुणानं वेगळ्याच कारणासाठी पोलीस संरक्षण मागितल्यानं पोलीसदेखील हैराण झाले आहेत. या तरुणानं चक्क खड्ड्यांपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली आहे. रस्त्यांची दुरवस्था, निकृष्ट दर्जाचे रस्ते आणि पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या 34 वर्षीय स्टॉक ब्रोकर चिराग हरिया यांनी अनोखे पाऊल उचललं आहे. चिराग हरिया यांनी डोंबिवलीहून कल्याणमध्ये कामासाठी प्रवास करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर संरक्षण पुरवल्यास त्यासाठी पैसे मोजण्याचीही तयारीही हरिया यांनी दर्शवली आहे. 

हरिया ज्या मार्गावरुन म्हणजेच कल्याणमधील शिवाजी चौकातून कार्यालय गाठतात त्याच मार्गावर काही दिवसांपूर्वी खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात दोन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. मृतांमध्ये एका 5 वर्षांच्या मुलाचा आणि महिलेचा समावेश आहे. वारंवार होणाऱ्या या अपघात व रस्त्यांवरच्या खड्ड्यांना वैतागून अखेर हरिया यांनी पोलीस संरक्षण पुरवण्याची मागणी केली.  रविवारी (8 जुलै) त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये याबाबत लेखी अर्ज दिला. या अर्जामध्ये त्यांनी धोकादायक रस्ता पार करण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. 

चिराग यांच्या मागणीमुळे पोलीस हैराण
चिराग हरिया यांनी अशा पद्धतीनं मागणी केल्यानं पोलीस अचंबित झाले.  पोलिसांनी त्यांचा अर्ज पोलीस उपायुक्तांकडे दिला. मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यानं हरिया यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्यांनी आपली मागणी ट्विटरवर पोस्ट केली.  हरिया यांनी असे ट्विट केले की, प्रवासासाठी हा रस्ता अतिशय धोकादायक आहे. यासाठी मी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली होती. संरक्षण पुरवल्यास मी पैसे देण्यासही तयार आहे. पावसाचं पाणी रस्त्यांवर साचतं तेव्हा कोठे खड्डा आहे? हा खड्डा किती मोठा? याचा अंदाज लावणं अशक्य असते. यामुळे मोठे अपघात होऊन निष्पापांना आपला जीव गमवावा लागतो. 

दरम्यान, पोलीस निरीक्षक प्रदीप यांनी हरिया यांच्या पोलीस संरक्षण पुरवण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. मात्र खड्डेयुक्त रस्त्यांवरुन प्रवास  करण्यास भीती वाटते म्हणून एखाद्या व्यक्तीला कसे संरक्षण पुरवणार, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Web Title: Mumbai rains: Man ready to pay for security on pothole-ridden Kalyan-Dombivali stretch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.