पालिका वास्तुविशारदाकडून होणार पोलीस वसाहतींचे ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:09 AM2019-07-01T00:09:53+5:302019-07-01T00:10:06+5:30
वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीमधील इमारत क्रमांक ५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ मधील पोलीस वसाहतींना वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा मे २०१९ मध्ये बजावल्या होत्या.
ठाणे : वर्तकनगर येथील पोलीस वसाहतींचे ठाणे महापालिकेच्या पॅनलवरील वास्तुविशारदामार्फत परीक्षण करण्यात यावे, त्याचा अहवाल आल्यानंतर इमारती रिक्त करण्याचा निर्णय घेण्यात यावा. तशीच गरज असेल तर योग्य ठिकाणी पोलीस कुटुंबीयांची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका प्रशासनाला शनिवारी दिले.
वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतीमधील इमारत क्रमांक ५१ ते ५३ तसेच १४ आणि १६ मधील पोलीस वसाहतींना वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त डॉ. चारुशीला पंडित यांनी इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा मे २०१९ मध्ये बजावल्या होत्या. या इमारती सी-२ बी या श्रेणीमध्ये असल्यामुळे त्या रिक्त न करता रचनात्मक दुरुस्ती करणे शक्य असल्याचेही यात म्हटले होते. दुरुस्तीनंतर इमारतीचे स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करण्याचेही या नोटिसांद्वारे बजावले होते. ही घरे पोलिसांना कायमस्वरूपी देण्याचा प्रस्ताव म्हाडाने राज्य शासनाला दिला असून तो प्रलंबित आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी हे स्थैर्यता प्रमाणपत्र देणे आवश्यक होते. त्यांनी ते न दिल्याने या इमारती धोकादायक असल्याने त्या राहण्यास योग्य नसल्याचा निर्वाळा पालिकेने पोलीस प्रशासनाकडे दिला. त्यामुळे धोका न पत्करता पोलीस प्रशासनाने ४८ तासांमध्येच या इमारती रिक्त करण्याच्या नोटिसा कर्मचाऱ्यांना बजावल्या. पर्यायी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात जायचे कुठे, असा यक्षप्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला. दरम्यान, पर्यायी व्यवस्था झाल्याशिवाय पोलीस कुटुंबीयांची घरे रिक्त केली जाणार नाहीत, असे आश्वासन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी कर्मचाऱ्यांना दिले.
- इमारती धोकादायक असल्या तरी त्या दुरुस्त करून राहण्यास योग्य असताना त्यांना रिक्त करण्याचे आदेश का बजावले, असा सवाल शिंदे यांनी केला.
- पालकमंत्री यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री पोलीस वसाहतीमधील महिला मंडळाने शिंदे यांची भेट घेतली.