इराणी सोनसाखळी चोरटयांना पकडणा-या नौपाडा पोलिसांना ठाणे आयुक्तांनी केले सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 09:05 AM2018-03-04T09:05:10+5:302018-03-04T09:05:10+5:30
भिवंडीतून तीन इराणींना जेरबंद करणा-या नौपाडा पोलिसांना तसेच चार वर्षापूर्वीच्या खूनाचा छडा लावून पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला अटक करणा-या मुंब्रा पोलिसांचा ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकताच सत्कार केला.
ठाणे: भिवंडीच्या इराणी पाडयातून तीन अट्टल सोनसाखळी चोरटयांना पकडून त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांचा ऐवज हस्तगत करणा-या नौपाडा पोलिसांचा आयुक्त परमवीर सिंग यांनी नुकताच प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केला. या कामगिरीमुळे नौपाडयात गेल्या दोन महिन्यात एकही सोनसाखळी चोरीचा गुन्हा घडला नसल्याचे कौतुकोद्गारही आयुक्तांनी काढले.
नौपाडयातील तसेच शहरातील इतर भागात दुचाकीवरुन येऊन जबरीने सोनसाखळी चोरीचे प्रकार करणाºया अट्टल सोनसाखळी चोरी करणा-या इराणींची माहिती पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना मिळाली होती. याच माहितीच्या भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील इराणींच्या वस्तीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे यांच्यासह ३० ते ३५ जणांच्या पथकाने मोठया कौशल्याने मोहम्मद जाफरी, यदुल्ला जाफरी अशा तीन इरांणींची धरपकड केली होती. सुरुवातीला तपासात सहकार्य न करणा-या या त्रिकुटाला ‘बोलते’ केल्यानंतर त्यांच्याकडून नौपाडयातील पाच ते सहा गुन्हयांची उकल झाली. त्यातील साडे चार लाखांचे १४ तोळे सोन्याचे दागिने, एक मोटारसायकल असा सुमारे पाच लाखांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. नौपाडयातील लीलावती रेळेकर यांचे तीन तोळे आठ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र त्यांनी हिसकावून पलायन केल्याचीही त्यांनी कबूली दिली. याच टोळीकडून गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकानेही मंगळसूत्र चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस आणले. नौपाडा पोलिसांच्या याच कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, निरीक्षक संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे आणि नाईक प्रशांत निकुंभ आदींना पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीमध्ये प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला.
........................
चार वर्षांपूर्वीच्या खूनाचा तपास
चार वर्षांपूर्वी पत्नीचा खून करणा-या अब्दुल्ला शेख याला मोठया कौशल्याने अटक करणा-या मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर, निरीक्षक रामचंद्र वळतकर, सहायक पोलीस निरीक्षक मंगेश बोरसे आणि नाईक सुनिल गिरी या पथकाचाही यावेळी आयुक्तांनी विशेष सत्कार केला. केवळ अनेक विवाह करता यावेत, म्हणून त्याने आपल्या या चौेथ्या पत्नीचा खून केला होता. शिवाय, पहिल्या पत्नीपासून झालेल्या स्वत:च्याच १३ वर्षीय मुलीवरही तो गेल्या तीन वर्षभरापासून लैंगिक अत्याचार करीत होता. हा सर्व प्रकार मुंब्रा पोलिसांनी उघड केला. यावेळी इतरही उत्कृष्ठ तपास करणाºया पोलिसांचा आयुक्तांनी गौरव केला.
..............................................
संजय धुमाळ यांचा चौथा सत्कार
ठाण्याच्या तीन हात नाका येथून रिक्षातून अपहरण झाल्यानंतर विनयभंग करणा-याला नौपाडा पोलिसांनी अटक केली होती. अन्य एका घटनेत चंदनवाडीतील ओमकार भोसले याने दोन साथीदारांसह दुचाकी जाळण्याचा प्रकार केला होता. हे प्रकरणही मोठया कौशल्याने उघड करण्यात आले होते. तर राजावत ज्वेलर्समध्ये साडे तीन किलोच्या सोन्याच्या बिस्कीटांची चोरी करणा-या त्यांच्या नोकराला अटक करण्यात आली होती. या तीन प्रकरणांसह भिवंडीतील इराणी पाडयातील सोनसाखळी चोरीतील इराणींना पकडण्यातही महत्वाची भूमीका बजावणा-या पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांचा पोलीस आयुक्तांनी गेल्या वर्षभरात चौथ्यांदा सत्कार केला.